esakal | भय इथले संपत नाही..! अद्यापही नातलगांच्या भेटी दुर्मिळच
sakal

बोलून बातमी शोधा

corona, covid 19

भय इथले संपत नाही..! अद्यापही नातलगांच्या भेटी दुर्मिळच

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : मार्च- एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोना भयावह लाटेत ज्येष्ठांसह अनेक तरुण- तरुणींना जीव गमवावा लागला. या परिस्थितीत धास्तावलेल्या अनेकांनी वैद्यकीय सल्ल्यानंतर घरी राहणेच पसंत केले. आता कोरोना लाट ओसरली असलीतरी अद्यापही नातलग फिरकत नसल्याची खंत अनेकजण व्यक्त करतात.

वर्षाच्या सुरवातीलाच आलेल्या कोरोना लाटेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. त्यामुळे सर्वांनीच मोठा धसका घेतला होता. आता परिस्थितीत सुधारणा झाली असलीतरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने अनेकांच्या मनात मोठी धास्ती आहे. त्यामुळे दूरचे सोडाच अगदी जवळचे नातेवाईकही दुर्मिळ झाल्याची खंत समाजातून व्यक्त होत आहे.

श्रावण महिना म्हटले की, अनेकांकडे पूजाअर्चा सुरू असतात. याकाळात सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. या पूजेसाठी व प्रसादासाठी आसपास राहणाऱ्यांसह जवळच्या नातेवाइकांनीही आमंत्रित केले जाते. मात्र, संसर्गाच्या भीतीने अनेकजण प्रसाद घेण्यासाठी जाणे टाळत असल्याचे काही कुटुंबीयांनी सांगितले. ग्रामीण भागासह शहरातही कोरोनाची धास्ती अद्यापही कमी झालेली नाही, हे वास्तव आहे.

हेही वाचा: वीर जवान सचिन चिकणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उपवासकरूही बनले दुर्मिळ

हिंदू धर्मियांत एखाद्याचे निधन झाल्यावर तिथीनुसार दर महिन्याला उपवासकरूला जेवायला बोलविले जाते. हा विधी साधारण अकरा महिने चालतो. त्यानंतर साडेअकरा महिन्याला वर्षश्राध्द विधी केला जातो. या विधीला नातेवाईक आदरांजली वाहण्यासाठी संबंधितांच्या घरी जातात, जेणेकरून त्यांचे दुःख कमी व्हावे. परंतु, आता वर्ष श्राद्धालाही मोजकीच मंडळी उपस्थित असते. इतकेच नव्हे तर निधन झालेल्या व्यक्तीच्या महिन्यालाही उपवासकरू मिळणे दुर्मिळ झाल्याचे अनेकांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात जिल्‍ह्यात १० दिवसांनंतर शंभरहून अधिक बाधित

केवळ मोबाईलवरच संभाषण

शहरात राहणाऱ्या बहुसंख्य नागरिकांचे मूळ खेड्यापाड्यात आहे. कोरोना उद्रेकापूर्वी संबंधितांचे एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर येणे- जाणे होते. मात्र, दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांसह तरुणांचा मृत्यू झाले. यात काही घरांतील कर्ते पुरुष, तर काही घरांतही एकुलत्या एक अपत्यांना जीव गमवावा लागला. ही धास्ती अजूनही कायम आहे. आता स्थिती पूर्वपदावर येऊनही कोणाकडे जाऊन आफत ओढवून घेण्यापेक्षा मोबाईलवर संभाषण करून ख्याली- खुशाली जाणून घेण्याकडे कल वाढला आहे.

आमचे एकत्र कुटुंब असून, घरात लहानमोठे धरून बावीस व्यक्ती राहतात. त्यामुळे मोठा राबता असतो. परंतु, कोरोना होण्याच्या भीतीने कालपरवापर्यंत नेहमी येणारे नातलगही फिरकत नाही, हे वास्तव आहे.

- रामदास माळोदे, हिरावाडी, पंचवटी

हेही वाचा: 'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'

loading image
go to top