esakal | परिस्थिती पूर्वपदावर, तरीही मनी भीती दाटून!

बोलून बातमी शोधा

nashik oxygen

परिस्थिती पूर्वपदावर, तरीही मनी भीती दाटून!

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन गळती लागून २४ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. अनेक रुग्णांना अन्य रुग्णालयांत स्थलांतरित केले, तर काहींना छोट्या सिलिंडरमधून ऑक्सिजन पुरवठा केला. या घटनेमुळे अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली. संपूर्ण रुग्णालयाच्या उपचार पद्धतीवर यामुळे परिणाम झाला होता. गुरुवार (ता.२२) परिस्थिती पूर्वपदावर आली. सद्यःस्थितीत १९ रुग्ण व्हेंटिलेटर व १०० रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. घटनेमुळे अनेकांना कासावीस करून सोडले आहे, घटनेबद्दल अजूनही भीती दाटून आहे.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता

घटनेबद्दल अजूनही भीती दाटून

सर्वांना आवश्यक ऑक्सिजन पुरवठा केल्याने उर्वरित रुग्णाची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. रुग्णालय हाउसफुल झाल्याने नवीन रुग्णांना पोर्चमध्ये खुर्चीवर बसून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. त्यांच्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी डॉक्टरांकडून घेण्यात आली. गुरुवारी रुग्णालय पूर्वपदावर आले होते, तरीदेखील येथील डॉक्टर तसेच कर्मचारी यांच्या डोळ्यासमोर मात्र दुर्दैवी घटनेचे क्षणचित्र डोळ्यासमोर सतत येत होते. कधी नाही ती परिस्थिती बघितल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आल्या. दरम्यान, ऑक्सिजन टॅंक लिक झाल्याने रुग्णांना त्यांच्या बेडजवळ ऑक्सिजन सिलिंडरमधून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. शुक्रवारी (ता.२२) ते सर्व सिलिंडर बेडजवळून हटवून मुख्य टॅंकमधून येणाऱ्या पाइपलाइनमधून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केला. घटनेपूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या आणि घटनेतून वाचलेल्या रुग्णांनादेखील बुधवारच्या घटनेची वारंवार आठवण येत असल्याने त्यांच्याही मनात कुठेतरी भीतीचे वातावरण दिसून आले. दिवसभर विविध वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांना काही अडचणी आहेत की काय, याची माहिती घेतली.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

सेंट्रलाइज पुरवठा

डॉ. हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा केवळ सेंटरलाइज पाइपलाइन पद्धतीने केला जात आहे. मुख्य ऑक्सिडेशन टॅंकमधून पाइपलाइन केली आहे. पूर्वी पाइपलाइन नसलेल्या बेडजवळ सिलिंडर टाकी लावून पुरवठा केला जात होता. टंचाईमुळे ती व्यवस्था बंद केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात येथील काही बेड रिकामे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाल्यास किंवा आवश्यकता भासल्यास जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिल्यास ते देखील पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.