Nashik News: पिंपळद येथे मादी बिबट्या जेरबंद! ग्रामस्थांच्या सहकार्याने वन विभागाचे मोठे यश | Female leopard jailed in Pimpald Big success of forest department with cooperation of villagers Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard News

Nashik News: पिंपळद येथे मादी बिबट्या जेरबंद! ग्रामस्थांच्या सहकार्याने वन विभागाचे मोठे यश

Nashik News : पिंपळद (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे मंगळवारी (ता. २३) बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यात ग्रामस्थ व वनविभागाला मोठे यश आले आहे.

पंधरा दिवसांपूर्वीही तळवाडे परिसरात नरभक्षक बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाला मोठी कसरत करावी लागली होती. (Female leopard jailed in Pimpald Big success of forest department with cooperation of villagers Nashik News)

नाशिक वनपरिक्षेत्राच्या हद्दीत पिंपळद येथे अंदाजे चार वर्ष वयाची बिबट्या मादी पकडण्यात आली. दुपारी तीनला केमिकल रेस्क्यूनंतर तिला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. बिबट्याने ज्या ठिकाणी लहान मुलीवर हल्ला केला होता, त्याच परिसरात या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

या भागात वनविभागाने यापूर्वीही एक मादी बिबट्या जेरबंद केली होती. उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, हरसुल वन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

दरम्यान, बिबट्या पकडण्याच्या माहितीला वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी दुजोरा दिला आहे. बिबट्याच्या रेस्क्यू मोहिमेत ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग घेत वनविभागास सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बिबट्या पकडल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला असून, वनविभागाला धन्यवाद दिले आहेत. पिंपळद परिसराला या मोहिमेमुळे युद्धभूमीच्या छावणीचे स्वरूप आले होते. सदर बिबट्या जिवंत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नरभक्षक बिबट्या?

पिंपळद येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बालिका ठार झाली होती. त्यानंतर तळवाडे, बाह्मणवाडे, शिरसगाव येथील परिसरांतही बिबट्याने दोन बालकांवर हल्ला करून ठार केले होते.

तर धुमोडी, गणेशगाव येथेही एका मुलाचा बळी घेतला होता. पिंपळद येथे ज्या ठिकाणी घटना घडली होती, त्याच परिसरात ग्रामस्थांनी मंगळवारी या बिबट्याला बघितले असल्याने हा बिबट्याने नरभक्षक असावा, असा कयास आहे.