esakal | सणासुदीमुळे बाजारपेठेत चैतन्य ; दिवाळीपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

सणासुदीमुळे बाजारपेठेत चैतन्य ; दिवाळीपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक गर्तेत आलेल्या भांडवली बाजारपेठेत सणासुदीमुळे चैतन्य निर्माण झाले आहे. घटस्थापनेसह दिवाळीपर्यंत डबघाईला आलेले अर्थचक्र पूर्ववत होण्यास मदत होणार असल्याचा विश्‍वास व्यावसायिक व्यक्त करीत आहे.

गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात नाशिक शहरात कोरोना पहिला रुग्ण आढळला होता. त्यापूर्वी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केला. महत्त्वाच्या सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अडीच महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने व्यवहार पुर्ववत झाले.

या वर्षाच्या सुरवातीपासून पुन्हा कोरोना संसर्गाने उचल खाल्यानंतर पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात आल्या. लागोपाठ दोन लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. पहिल्या लॉकडाउनमध्ये कारखानदारी बंद होती, तर नाशिक शहरात ज्या व्यवसायात सर्वाधिक उलाढाल होते ते रिअल इस्टेट क्षेत्राची उलाढाल थांबली. मे महिन्यानंतर कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्यानंतर व्यवहार पुर्ववत होण्यास सुरवात झाली, परंतु दुसरीकडे तिसऱ्या लाटेची भीती असल्याने दचकतच व्यवहार सुरू झाले. तिसरी लाट येईल तेव्हा येईल, परंतु सणासुदीत भारतीय मार्केट उचल खातेच. म्हणूनच गणेशोत्सवापासून बाजारात निर्माण झालेले चैतन्य नवरात्रात वाढणार आहे. त्यानंतर पुढील वीस दिवस दिवाळीचे राहणार असल्याने बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होत आहेत.

रिअल इस्टेटमध्ये तेजी

संपूर्ण राज्यासाठी एकच बांधकाम विकास नियंत्रण नियमावली लागू झाली असली तरी त्या अनुषंगाने व्यवसाय करण्यासाठी पोषक वातावरण नव्हते. नवरात्रानिमित्त पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत बुकिंगसाठी शहरात नव्याने दीडशेहून अधिक नवीन प्रकल्पांना मुहूर्त लागला आहे. ग्राहकांकडून विचारणा होत असल्याने रिअल इस्टेटच्या बाजाराचे भवितव्य उजळण्यास सुरवात झाली आहे.

हेही वाचा: परतीच्या पावसाने द्राक्षपंढरी हादरली; परिसरात गारपिटीसह वादळी पाऊस

वाहन, सोने बाजाराला झळाळी

इंधनाचे भाव वाढत असले तरी नवीन वाहने खरेदीकडे कल आहे. डिझेल दरवाढीमुळे चारचाकी वाहनांचे मार्केटमधील तेजी सर्वसाधारण स्वरूपात असली तरी सेकंड हॅन्डचे मार्केट तेजीत आहे. इलेक्ट्रीक वाहनांना इंधन दरवाढ मुळे पसंती मिळत आहे. सोन्याच्या किमतीत वाढ होत असली तरी पारंपरिक पद्धतीने सोने खरेदी होतच आहे. दिवाळीत अधिक खरेदी वाढेल, असा विश्‍वास व्यावसायिकांनी व्यक्त केला.

सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर निश्‍चितच बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. कोरोनामुळे लाईफस्टाईल मध्ये बदल झाल्याने राहण्यासाठी योग्य अशा घरांचा शोध आहे. नाशिकमधील बांधकाम व्यवसायिकांकडून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण होत आहे.

- निशित अटल,

संचालक, एबीएच डेव्हलपर्स.

कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना सणासुदीत ग्राहकांकडून वाहन खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. एसयूव्ही कारला अधिक ग्राहकांची पसंती आहे. सणापुर्वीचं लॉचिंगला शंभर वाहनांचे बुकिंग झाल्याने तेजी आहे.

- अमिश शाह,

संचालक, भाविन व्हील्स.

loading image
go to top