
Ramtirtha : ‘रामतीर्थ'वर अखेर शिक्कामोर्तब! गोदावरीबाबत मुनगंटीवारांनी घेतला महाआरतीचा निर्णय
नाशिक : दक्षिणवाहिनी गोदावरीच्या येथील सुंदर नारायण मंदिर ते मोदकेश्वर मंदिर हा भाग ‘रामतीर्थ' असल्यासंबंधी पौराणिक, पुराण, संत वाड्मय, ऐतिहासिक दाखल्याच्या आधारे ‘सकाळ'ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती.
अखेर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ‘रामतीर्थ'वर शिक्कामोर्तब झाला. श्री. मुनगंटीवार यांनी सोशल मीडियातून ‘रामतीर्थ' हा विषय प्रसारित केला.
तसेच यावेळी श्री क्षेत्र काशी, हरिद्वार, अयोध्येच्या धर्तीवर रामतीर्थ घाटावर गंगा गोदावरी मातेची दररोज सायंकाळी सातला सामुहिक महाआरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Finally sealed on Ramtirtha minister Mungantiwar decided to perform Maha Aarti regarding Godavari river like kashi haridwar nashik news)
रामतीर्थ घाट परिसरातील नूतनीकरणासंबंधी बैठकीत चर्चा झाली. त्यात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीसाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी., पंचकोठी गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, स्मार्त चूडामणी शांतारामशास्त्री भानोसे, नाशिक इतिहास संकलन समितीचे जयंत गायधनी, दीपक भगत आदी उपस्थित होते.
प्रकल्पाच्या सादरीकरणावेळी रामकुंड असा उल्लेख पाहिल्यावर श्री. भानोसे यांनी कुंड आणि तीर्थ याच्यातील अर्थ विशद करत ‘रामतीर्थ' असा शब्द अनादी काळापासून प्रचलित असल्याची बाब मांडली. ‘सकाळ'ने यासंबंधीची माहिती प्रसिद्ध केल्याचे श्री. भानोसे यांनी स्पष्ट केले. त्याचक्षणी श्री. मुनगंटीवार यांनी ‘रामतीर्थ' असा बदल करण्यात यावा, असे सांगितले.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
महाआरतीसाठी...
महाआरतीसाठी पुरोहितांसाठी पोशाख निश्चित करण्यात यावा. महाआरतीसाठी चौथरा बांधण्यात यावा. महाआरतीसाठी वाराणसीहून आरती तयार करून घ्यायची. चौथऱ्यावरील चौरंगावर शंख, घंटा, धूपदानी, दीपदानी आदी साहित्य असेल.
शिवाय घाट व परिसराच्या नूतनीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.