NMC News : मायको सर्कल, त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलासाठी आर्थिक तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC

NMC News : मायको सर्कल, त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलासाठी आर्थिक तरतूद

नाशिक : त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल येथे उड्डाणपूल रद्द झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पूर्ण रद्द झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात विधानसभेमध्ये माजी पालकमंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर नगर विकास विभागाने लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे किमान कागदोपत्री उड्डाणपुलाचा वाद जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Financial provision for Mico Circle Trimurti Chowk flyover Answered by Nagar Vikas on question in Assembly NMC News)

२०२०- २२ च्या अंदाजपत्रकामध्ये सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते उंटवाडी दरम्यान एक उड्डाणपूल व मायको सर्कल येथे दुसरा उड्डाणपूल तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूददेखील करण्यात आली, मात्र मुलाच्या कामाला सुरवात होण्याअगोदरच वादाचे मोठे मोहोळ उठले.

सुरवातीला वाहतूक सर्वेक्षण नसतानाच उड्डाणपूल तयार करण्याची घोषणा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर उड्डाणपुलासाठी एम ४० ग्रेड सिमेंटच्या प्रस्ताव मंजूर असताना ६० एम ग्रेड बदलाला मंजुरी देण्यात आली.

त्यामुळे पुलाच्या किमतीमध्ये ४४ कोटी रुपयांची वाढ झाल्याचा दावा करण्यात आला. उड्डाणपूल तयार करण्यासाठी जवळपास ५०० झाडे तोडावी लागणार असल्याने पर्यावरणप्रेमींनीदेखील उच्च न्यायालयात धाव घेतली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलासाठी म्हणून दर्जा प्राप्त झालेल्या वृक्षांचादेखील बळी दिला जाणार असल्याची ओरड करून आंदोलनदेखील झाले. उड्डाणपुलावरून राजकारण तापले असताना आयआयटी पवईकडून फुलांची व्यवहारता तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.

आयआयटी पवईने पुलांची आवश्यकता नसल्याचे अहवालात म्हटले. त्यानंतर उड्डाणपूल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु विधानसभेमध्ये माजी पालकमंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दोन्ही उड्डाणपूल संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला.

त्याला उत्तर देताना नगर विकास विभागाने महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार फुलांचे काम रद्द झाले नसल्याचे स्पष्ट केले. कार्यारंभ आदेश देऊनही ठेकेदारांनी काम सुरू केल्याने नोटीस देण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे.