H3N2 Flu : नाशिक जिल्ह्यात आढळला H3N2 फ्ल्यूचा पहिला रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flu H3N2

H3N2 Flu : नाशिक जिल्ह्यात आढळला H3N2 फ्ल्यूचा पहिला रुग्ण


नाशिक :
शहरात एच३एन२ फ्ल्यूचा 4 रूग्ण आढळल्यानंतर आता जिल्हयातही एच३एन२ फ्ल्यूचा रूग्ण सापडला आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील एका रूग्णास एच३एन२ ची लागन झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात रूग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक शहरात गत महिन्यात 4 रुग्ण एच३ एन२ फ्ल्यू बाधित रुग्णआढळले होते. त्यामुळे आता जिल्हयाच्या एच३ एन२ बाधित फ्ल्यूचे रुग्ण फेब्रुवारी महिन्यात २ तसेच मार्च महिन्याच्या पूर्वार्धात २ रुग्ण उपचारासांठी रुग्णालयात दाखल झाले होते. चारही रुग्ण शहरातच आढळल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार होऊन ते बरेदेखील झाले होते.

मात्र, शनिवारी (ता.25) आढळलेला ग्रामीण भागातील पहिला आणि नाशिक जिल्हयातील पाचवा रुग्ण हा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंतचा आहे. मूळ परराज्यातील रहिवासी असलेल्या या नागरिकाची तपासणी केली असता तो एच३ एन२ बाधित असल्याचे आढळले. त्यामुळे त्याला नाशिक शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

एच३ एन२ फ्ल्यू आजारात सर्दी, खोकला,ताप, अंगदूखी, डोकेदूखी, जुलाब, उलटी, यातील काही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराकडे केवळ साधा फ्ल्यु म्हणून दूर्लक्ष करु नये, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

या आजारवर 3 टप्प्यांमध्ये इलाज

या आजारात तीन टप्पात रुग्णांवर इलाज केला जातो. प्राथमिक तपासणीतून औषधोपचार करुन घरी पाठवणे, रुग्णालयात दाखल करुन उपचार करणे आणि गंभीर लक्षणे आढळल्यास व्हँटीलेटरच्या आधाराने उपचार करणे आवश्यक ठरते.

प्रत्येक एच ३ एन २ हा बहुतांशरित्या घातक आजारात मोडत नसला तरी संसर्गजन्य असल्याने याबाबत काळजी घेणे गरजेचे ठरते. एच3एन2 या आजाराबाबत लोकांनी घाबरुन न जाता वैद्यकिय उपचार तातडीने घ्यावे. घरगुती इलाजात वेळ घालवू नये हा संसर्गजन्य आजार असल्याने घरात पसरु शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. हर्षल नेहते यांनी केले आहे.


आरोग्य विभागाचा ताण वाढला
गत महिन्यापासूनच नाशिक महापालिकेसह जिल्हा यंत्रणेला कोविडबाबत सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शहरात एकीकडे कोविडचे रुग्ण वाढत असताना 'एच ३ एन २ या फ्लूचा धोका देखील वाढला आहे. वाढत्या कोविडमुळे यंत्रणा पुन्हा कामाला लागलेली असताना जिल्हयाच्या ग्रामीण भागात एच३ एन२ फ्ल्यूचा रुग्ण आढळू लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार आहे.

टॅग्स :CoronavirusNashik