
गुढीपाडव्यामुळे फुलांचे दर झाले डबल; कडुनिंबाच्या पानांनाही मागणी
पंचवटी (नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या फुलांचे भाव घसरले होते. परंतु गुढीपाडव्यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या दराने शुक्रवारी (ता. १) बाजारात मोठी उसळी घेतली. गुढीसाठी लागणारी कडुनिंबाची पानेही भाव खाऊन गेली. गत दोन वर्षांपासून कोरोना उद्रेकामुळे सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण होते. मात्र रूग्णसंख्या शून्यावर आल्याने प्रशासनाने सर्वच बंधने शिथिल केल्याने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे.
20 रुपयांचा हार पन्नासपर्यंत
उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा परिणाम फूल उत्पादनावर होऊ लागल्याने आवक काहीशी घटली आहे. आवकेतील घट, गुढीपाडवा यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत मोठी वाढ झाली. एरवी शंभर रुपयांपर्यंत उपलब्ध होणाऱ्या झेंडूच्या कॅरेटचा दर तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत गेला तर किलोभर बिजली फुलांसाठी शंभर ते दीडशे रुपये मोजावे लागले. याशिवाय गुलाबाच्या फुलांच्या दरांतही मोठी वाढ झाली. पाच रूपयांत उपलब्ध होणारा लिली बंडल २० रुपयांपर्यंत पोचला, तर ऐंशी ते शंभर रुपये किलोने उपलब्ध होणारी शेवंती दोनशे रुपये किलोपर्यंत पोचली.
हेही वाचा: गुढीपाडव्यामुळे बाजारपेठेत चैतन्य; महागाईमुळे मजुर हतबल
गुलाबाचा हार चक्क दोन हजार रुपये
हिंदू धर्मियांत साडेतीन मुहुर्तांचे महत्त्व अद्यापही अबाधित आहे. त्यात चैत्र महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्याचे महत्त्व मोठे आहे. या दिवशी सोन्यापासून घरे, प्लॉट, फ्लॅट, दुचाकीसह चारचाकीची खरेदीला मोठी पसंती असते. गणेशवाडीतील एका फूल विक्रेत्यांकडे नव्या चारचाकी गाड्यांसाठी दहा हारांची मागणी नोंदविण्यात आली आहे. मोठ्या स्वरूपातील या एका हाराची किंमत दोन हजार रुपये असल्याचे विक्रेते प्रफुल्ल माळी यांनी सांगितले.
कडुनिंब पानांची मोठी आवक
हिंदू धर्मीय गुढीपाडव्याला भल्या सकाळी घराच्या प्रवेशद्वारालगत गुढी उभारतात. या गुढीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर काठ्या उपलब्ध असून त्या वीस रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. याशिवाय शुक्रवारी सकाळी कडुनिंबाच्या पानांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून ती दहा रूपयांत उपलब्ध आहेत.
हेही वाचा: सोशल मीडियावर पुस्तकांचे मार्केटिंग; नवोदितांनी निवडलाय अनोखा पर्याय
''फुलांच्या दरांत मोठी वाढ झाल्याने सर्वच प्रकारच्या हारांच्या दरांत दुप्पट, तिप्पट वाढ झाली. सण- उत्सवामुळे पुढील काळात अशीच तेजी राहण्याची शक्यता आहे.'' - गणेश गरकळ, फूल विक्रेते
''गुढीपाडव्यामुळे फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तीव्र उन्हामुळे आवकेत मोठी घट झाल्याने सर्वच प्रकारच्या फुलांचे दर तेजीत आहेत.'' - प्रफुल्ल माळी, फूल विक्रेते.
Web Title: Flower Price Hike Due To Gudi Padwa Festival Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..