
Shiv Jayanti 2023 : शिवजयंती मिरवणूक मार्गांवर दीड हजार पोलिसांचा ताफा
नाशिक : मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सुमारे दीड हजार पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा चोख पोलिस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तसेच, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. (force of 1500 police on Shiv Jayanti procession route nashik news)
रविवारी (ता. १९) दुपारी चार वाजता मुख्य मिरवणुकीला वाकडी बारव (भद्रकाली) येथून दुपारी प्रारंभ होईल. मिरवणूक वाकडी बारव, दूध बाजार, विजयानंद टॉकीज, गाडगे महाराज चौक, मेनरोड, धुमाळ पॉइंट, सांगली बॅंक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट लेन, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक,
परशुराम पुरिया रोडने रामकुंडावर विसर्जित होणार आहे. भद्रकाली, सरकारवाडा आणि पंचवटी या तीनही पोलिस ठाण्यांचे प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची मिरवणुकीवर बारकाईने नजर असणार आहे. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
शहरातील मिरवणुकीसाठी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह दोन सहाय्यक आयुक्त, निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, पुरुष- महिला कर्मचारी, एक स्ट्रायकिंग फोर्स, एक एसआरपीएफचे पथक तैनात असेल. तर परिमंडळ दोनसाठी उपायुक्त
चंद्रकांत खांडवी यांच्यासह दोन सहाय्यक आयुक्त, निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, पुरुष-महिला कर्मचारी, एक स्ट्रायकिंग फोर्स, एक एसआरपीएफचे पथक असे सुमारे दीड हजार पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलिस नियंत्रण कक्षात शीघ्र कृती दलाचे दोन पथक, एसआरपीएफचे पथक सज्ज असणार आहे.
२९० मंडळांना परवानगी
शिवजयंतीनिमित्त शहरात २९० मंडळांनी पोलिसांकडून अधिकृत परवानगी प्राप्त केली आहे. बॅनरला तपासून पोलिसांनी परवानगी दिली. तर मुख्य मिरवणुकीसाठी पाच मंडळांनी नोंदणी केली आहे. या मिरवणुकीला भद्रकालीतील वाकडी बारव येथून दुपारी चार वाजता प्रारंभ होईल आणि रात्री बारा वाजेपर्यंत मुदत आहे.