झेंडा कुठलाही असू द्या दांडा आपलाच..! माजी आमदारांच्या मिसळ पार्टीची राजकीय वर्तुळात चर्चा 

misal.jpg
misal.jpg

नाशिक : भाजपच्या राज्य उपाध्यक्षपदावर असूनही राजकारणापासून अनेक वर्षांपासून दूर राहिलेल्या माजी आमदार वसंत गिते यांची नववर्षाच्या सुरवातीला होणारी मिसळ पार्टी राजकीय वर्तुळात चर्चेला आली आहे. गिते पक्ष बदलणार की भाजपमध्येच राहणार, यावर चर्चा केंद्रित झाली असून, तूर्त कुठलाच बदल नसल्याचे ते सांगत असले तरी कुठल्या झेंड्याखाली मिसळ पार्टी होणार, यावर ‘झेंडा कुठलाही असू द्या, दांडा आपलाच राहणार’, असे सूचक वक्तव्य करून संभ्रमावस्था कायम ठेवली आहे. 

मिसळ पार्टीची राजकीय वर्तुळात चर्चा 
शहराचे राजकारण आणि वसंत गिते यांच्या नजीकचा संबंध आहे. महापालिकेवर शिवसेनेचा पहिल्यांदा भगवा फडकविण्याचे त्यांचे श्रेय आहे. शिवसेनेचे पहिले महापौर, बिनविरोध निवडणूक जिंकणारे पहिले नगरसेवक, मनसेचे पहिले आमदार व महापालिकेत मनसेची सत्ता आणण्याचा त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. शिवसेना-मनसे व सध्या गिते भाजपमध्ये स्थिरावले आहेत. अनेक वर्षांपासून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्याचे दिसले नाही. कार्यकर्त्यांमध्ये वावरणारा नेता, अशी त्यांची ख्याती आहे. सत्तेचे पद त्यांना मिळाले नाही. मुलगा प्रथमेश याला पहिल्याच खेपेत उपमहापौरपद देऊन भाजपने त्यांना जखडून ठेवले खरे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट दिले नाही. विजयाची संधी असूनही त्यांना तिकीट न दिल्याने त्यांची सुप्त नाराजी लपून राहिली नाही.

गिते राजकारणात नवी इनिंग घेण्याच्या तयारीत

राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी देऊ केली. पण त्यांनी नकार दिल्याने काँग्रेसकडून डॉ. हेमलता पाटील यांना निवडणुकीचे तिकीट दिले गेले. डॉ. पाटील यांना मिळालेल्या मतांचा विचार करता त्या जागी गिते निवडणूक लढले असते तर त्यांना अधिक मते मिळून निवडून आले असते, अशी भावना त्यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. एकनाथ खडसे यांनी भाजपला ठोकलेला राम राम, विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले यश, बाळासाहेब सानप यांचे राजकारणातील पुन्हा सक्रियता व आगामी महापालिका निवडणुकीत शक्ती दाखविण्याची संधी या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर गिते राजकारणात नवी इनिंग घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे.

मिसळ पार्टीतून जुळवाजुळव 
राजकारणात सक्रिय होताना गिते यांनी नववर्षाच्या आगमनाचे निमित्त साधत मिसाळ पार्टीचे आयोजन केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मिसळ पार्टीतून मित्र कंपनीची जुळवाजुळव केली जाणार आहे. ही जुळवाजुळव नेमकी कशासाठी, त्यावर चर्चा रंगली आहे. गिते यांच्याकडून स्पष्टपणे माहिती न देता संदिग्धता ठेवली जात आहे. कुठल्या झेंड्याखाली मिसळ पार्टी आयोजित केली आहे, यावर बोलताना ‘झेंडा कुठलाही असू द्या, दांडा आपलाच राहील’, ‘शिवसेनेत जाणार का’, या प्रश्नावर त्यांनी शिवसेना माझी आई असल्याचे सूचक उद्‌गार काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

प्रवेशाची निव्वळ चर्चा 
गिते हे तूर्त भाजप सोडणार नाही. ते राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जातील अशा कंड्या पिकवल्या जात असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत राहण्यासाठी ते व समर्थक पक्ष प्रवेशाच्या चर्चा घडवून आणत असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com