
Nashik News: रामतीर्थावर शेवाळ साचल्याने घसरण्याचे प्रकार; साफसफाई करण्याची मागणी
नाशिक : चारपाच वर्षांपूर्वी रामतीर्थातील पाणी सोडून देऊन ते कुंड संपूर्ण रिकामे करून साफसफाई केली जात होती. परंतु त्यानंतर हे काम थांबविण्यात आले. त्यामुळे रामतीर्थाच्या पाण्यात सुक्ष्म जीव तयार झाले असून ते पात्रात उतरणाऱ्यांच्या पायाला चावा घेत असल्याचे अनेकांनी सांगितले.
त्यातच सध्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचल्याने अनेकजण पाय घसरून पडत आहेत. रामतीर्थ पूर्वीसारखेच संपूर्ण रिकामे करून त्याची साफसफाई व्हावी, अशी मागणी आहे. (Forms of collapse due to accumulation of moss on Ram Tirtha Demand for cleaning Nashik News)
दुसरीकडे गोदापात्रातील तळ काँक्रिट काढण्याबाबत उच्च न्यायालय पाठोपाठ निरीने निर्णय देऊनही रामतीर्थासह अन्य कुंडातील तळ काँक्रिट काढण्याबाबत चालढकल सुरू आहे. नदीपात्र प्रवाहित नसल्याने रामतीर्थातील पाणीही दूषित झाल्याने आरोग्याचे प्रश्न उपस्थित होत आहे.
भूगर्भ संशोधन विभागांसह निरीने गोदापात्रातील तळ काँक्रिट काढून नदीपात्रातील जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीकडे आग्रह धरला आहे. पण त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गोदाप्रेमी सेवा समितीने पत्राद्वारे केला आहे.
मात्र त्याबाबत सातत्याने चालढकल सुरू असल्याचे समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी सांगितले. रामतीर्थातील पाणी दूषित असल्याने भाविक केवळ हातपाय धुण्यावरच समाधान मानतात. रामतीर्थातील पाणी घेण्यापेक्षा अनेकजण गोमुखातील पाणी बाटलीत भरून घेण्यास पसंती देतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून गोमुखही बंदच आहे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
"रामतीर्थासह अन्य कुंडातील तळ काँक्रिट काढण्याबाबत निरीसह भूगर्भ विभागाने परवानगी देऊनही त्याकडे काणाडोळा केला जात आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास न्यायालयाच्या अवमानाबाबत पुन्हा याचिका दाखल करू."- देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती
"पूर्वी रामतीर्थाची दर आठवड्याला स्वच्छता केली जात होती. परंतु गेल्या कित्येक महिन्यात त्या पद्धतीने संपूर्ण साफसफाई झालेली नाही. त्यातच गोदा प्रवाहित नसल्याने कुंडात केवळ साचलेले पाणी आहे." - सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ