esakal | सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष भोवले; एकाच कुटुंबातील चौघांची अंत्ययात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

funeral

सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष भोवले; एकाच कुटुंबातील चौघांची अंत्ययात्रा

sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर (जि.नाशिक) : कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड न मिळणे, ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत दुखणे अंगावर काढणे म्हणजे साक्षात मृत्यूला जवळ करण्यासारखे आहे. अंगदुखी, सर्दी व किरकोळ तापाकडे दुर्लक्ष केल्याचे धक्कादायक परिणाम उजनी येथील एका कुटुंबाचा भोगावा लागला.

अंत्यविधीला नियम दुर्लक्षित

नेहमीच्या डॉक्टरांकडे गेल्यावर पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे सांगत आजारी पती-पत्नीवर उपचार सुरू केले. या उपचारादरम्यान घरातील अन्य माणसे संपर्कात आली आणि वृद्ध वडिलांचा (वय ८७) मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी कोरोना नियम अर्थातच दुर्लक्षित झाले. अंत्यविधी आटोपल्यावर पती-पत्नीस अधिक त्रास होऊ लागल्याने प्रारंभी सिन्नरचे कोविड रुग्णालय व तेथून लागलीच धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडिलांच्या राखेच्या कार्यक्रमासही मुलगा व सुनेस थांबता आले नाही. अर्थात, ही गोष्ट इथेच थांबली नाही, तर आजारी पती-पत्नीपाठोपाठ त्यांचा मुलगा, सून व भावजय कोरोना पॉझिटिव्ह असल्याने दवाखान्यात दाखल झाल्या. त्रास वाढू लागला तसे पती-पत्नी एका दिवसाच्या अंतराने मृत पावले. त्यांचा अंत्यविधी हॉस्पिटलमार्फत उरकण्यात आला, तर त्रास वाढत गेल्याने घरीच विश्रांती घेणाऱ्या पहिल्या मृताच्या पत्नीने (वय ८२) देखील डोळे मिटले. म्हणजे एकाच कुटुंबात आई-वडील, मुलगा व सुनेचा आठवड्यात मृत्यू झाल्याची ही हृदयद्रावक घटना होती.

उजनी येथील एका कुटुंबात धक्कादायक मृत्यू

तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरले असून, उपचारासाठी विलंब करणाऱ्या अनेक रुग्णांचा जीव धोक्यात येऊ पाहत आहे. गेल्या सप्ताहात तालुक्यातील उजनी येथील एकाच कुटुंबातील चौघांचे कोरोनामुळे मृत्यू झाले असून, गावातील आणखी काही बाधित रुग्ण अत्यवस्थ असल्याने भीतीचे वातावरण आहे. कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड न मिळणे, ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत दुखणे अंगावर काढणे म्हणजे साक्षात मृत्यूला जवळ करण्यासारखे आहे. अंगदुखी, सर्दी व किरकोळ तापाकडे दुर्लक्ष केल्यावर आजार बळावला आणि कोरोनाने गाठले असा प्रकार उजनी येथील एका कुटुंबात घडला.

संशयित तपासणीसाठी पुढे येत नसल्याने भीती

गावात याचदरम्यान आणखी एका व्यक्तीचाही कोरोनाने मृत्यू झाल्याची चर्चा असून, काही अत्यवस्थ रुग्णांना दोन दिवसांपासून सिन्नर, एसएमबीटी रुग्णालय, सिन्नर, नाशिक आणि संगमनेर येथे बेड मिळत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पहिल्या रुग्णाच्या अंत्यविधीसाठी गर्दी केलेले काही जण आजारी असून, त्यांची तपासणी केल्यास आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. हे रुग्ण स्वतःची तपासणी करून घ्यायला पुढे येत नसल्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.