Nashik Fraud Crime : माजी नगरसेवकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money Fraud News

Nashik Fraud Crime : माजी नगरसेवकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : बनावट मृत्युपत्रासह बेकायदेशीरपणे मिळकतीचे दस्तऐवज बनवून मिळकत बळकावल्याप्रकरणी भगूरचे माजी नगरसेवक अंबादास परशराम कस्तुरे यांच्यासह तिघांविरुद्ध नाशिक रोड सत्र न्यायालयाने फसवणुकीच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे. (Fraud case registered against former corporators Nashik Crime news)

विलास बाळकृष्ण कस्तुरे (रा. राममंदिर रोड, तेली गल्ली, भगूर) यांनी नाशिक रोड सत्र न्यायालयात याप्रकरणी दावा दाखल केला होता. विलास कस्तुरे यांच्या दाव्यानुसार भगूर, राहुरी आणि भगूर सिटी सर्व्हेत मिळकती असून, या मिळकती बळकावण्यासाठी संशयित अंबादास कस्तुरे, दयाराम कस्तुरे, गणेश कस्तुरे (सर्व रा. तेली गल्ली, भगूर) यांनी संगनमताने परशराम कस्तुरे यांचे बनावट मृत्युपत्र तयार केले.

तसेच, मिळकतीचे बनावट दस्तऐवज बनवून मिळकती बळकावल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात तक्रारदार कस्तुरे यांनी देवळाली कॅम्प पोलिसात फिर्याद दिली असता, तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी हलगर्जीपणा करीत गुन्हा दाखल केला नाही.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

त्यामुळे तक्रारदार कस्तुरे यांनी नाशिक रोड सत्र न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला. या दाव्याची दखल घेत सत्र न्यायालयाने देवळाली कॅम्प पोलिसांना या दाव्यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

सदरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. देशमुख यांनी संशयित तिघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गेल्या ९ तारखेला गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच, या प्रकरणात संशयितांना हजर राहण्याचे आदेशही बजावले आहेत. तक्रारदारातर्फे ॲड. विश्‍वास चौगुले यांनी कामकाज पाहिले.