
Nashik News : नांदगाव तालुका विकासकामांसाठी 212 कोटीचा निधी
नांदगाव (जि. नाशिक) : आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते, पूल यासह विविध स्वरूपाच्या विकासकामांसाठी २१२ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.
रस्त्यांच्या व पुलांच्या कामांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतीमाल ने आण करण्यासाठी तसेच नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोईस्कर होणार असल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (Fund of 212 crores for Nandgaon taluka development works Nashik News)
नांदगाव मतदार संघातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. रस्ते व पूल सुधारणा व दुरुस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची चणचण जाणवत होती. तसेच अनेक रस्त्यांवर पूल नसल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
पावसाळ्याच्या कालावधीत नदी नाल्यांना पूर आल्यामुळे वाहतूक बंद होऊन अनेक गावे व वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे रस्त्यावर पूल बांधणे रस्त्यांची सुधारणा होणे आवश्यक होते.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
यासाठी आमदारांनी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांचे व पुलांचे कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने नांदगाव मतदार संघातील राज्य मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची सुधारणा व पुलांच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला.
त्यापैकी नांदगाव तालुक्यात ७९ कोटी १० लाख निधी मंजूर करण्यात आला असून राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी ३२ कोटी ६५ लाख तर इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांसाठी ४५ कोटी ४५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघातील व मालेगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी १२४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.