Nashik Crime: लिफ्ट मागायची, गुंगीचे औषध देत लुट करणारी टोळी गजाआड; मुख्य सूत्रधार महिलेसह 5 जणांना अटक | gang arrested robbing by asking for lift 5 people arrested including main facilitator woman Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime: लिफ्ट मागायची, गुंगीचे औषध देत लुट करणारी टोळी गजाआड; मुख्य सूत्रधार महिलेसह 5 जणांना अटक

Nashik Crime: लिफ्ट मागायची, गुंगीचे औषध देत लुट करणारी टोळी गजाआड; मुख्य सूत्रधार महिलेसह 5 जणांना अटक

Nashik Crime : शहराबाहेर रस्त्यालगत थांबून चारचाकीत वाहनचालक एकटा असल्याचे हेरून लिफ्ट मागायची. वेळही सायंकाळची निवडायची. जेणेकरून वाहनचालक कुठेतरी चहा, नाश्‍ता वा जेवणासाठी थांबेल.

त्यावेळी संधी साधून चालकाच्या खाण्याच्या पदार्थांमध्ये गुंगीचे औषध मिसळवायचे. अथवा, देवाचा प्रसाद म्हणून गुंगीचे पेढे द्यायचे, चालक बेशुद्ध झाला की त्याला जंगलात टाकून कारसह त्यांच्यावरील दागिने, महागड्या वस्तू व पैसे काढून लुट करणाऱ्या टोळीला नाशिक शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.

विशेषत: या टोळीचा मुख्य सूत्रधार एक महिला आहे. (gang arrested robbing by asking for lift 5 people arrested including main facilitator woman Nashik Crime)

काजल उगरेज (रा. रामवाडी, नाशिक), निलेश राजगिरे (रा. ओझर, ता. निफाड), किरण वाघचौरे (रा. जेलरोड, नाशिक), मनोज पाटील (रा. ओझर, ता. निफाड), दिनेश विजय कबाडे (रा. जत्रा हॉटेलच्या मागे, आडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

बापू किसन सूर्यवंशी (रा. सावतानगर,सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या १२ मे रोजी अनोळखी महिलेने त्यांना फोन करून सुरतला जायचे असल्याचे सांगून दिंडोरी रोडवरील सायबा हॉटेलसमोर त्यांची कार बोलाविली.

संशयित महिला कारमध्ये बसली. त्यानंतर वणीतून दुसरा संशयित कारमध्ये बसला. वाटेत संशयित महिलेने सूर्यवंशी यांना देवाचा प्रसाद म्हणून पेढा खाण्यास दिला. त्यानंतर काही मिनिटात सूर्यवंशी बेशुद्ध झाले.

संशतियांनी त्यांची कार, अंगावरील दागिने, पैसे असा १ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून पसार झाले होते. याप्रकरणी १९ मे रोजी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा तपास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक करीत असताना, तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित राजगिरे यास अटक केली. त्याच्या चौकशीतून मुख्य सूत्रधार काजल उगरेज, दिनेश कबाडे, किरण वाघगौरे, मनोज पाटील यांनाही शिताफीने पोलिसांनी सापळे रचून अटक केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जेलरोड परिसरातून चोरीची स्विफ्ट कार (एमएच १९ बीयु ६५८५) सह कबाडे यास अटक केली. पोलीस तपासातून चार गुन्ह्यांची उकल झाली असून, यात म्हसरुळ व आडगाव पोलीस ठाण्यातील दोन तर कासा (जि. पालघर), वाळुंज (जि. संभाजीनगर) पोलीस ठाण्याच्या हददीतील लुटीच्या गुन्ह्यांचीही उकल झाली आहे.

संशयितांकडून चोरीच्या तीन कार, सोन्याचे दागिने असा १४ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यातील कबाडे याच्यावर कनबा (अहमदाबाद) पोलीस ठाण्यात खुनाचा तर वाघचौरे याच्याविरोधात श्रीरामपूर पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्‌छाव, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, नझीम पठाण, धनंजय शिंदे, विशाल देवरे, विशाल काठे, महेश साळुंके, अप्पासाहेब पानवळ, मुख्तार शेख, सुरेश माळोदे, योगीराज गायकवाड, मनोज डोंगरे, रावजी मगर, किरण शिरसाठ, समाधान पवार यांनी सदरची कामगिरी बजावली.

गुंगीच्या दहा गोळ्यांचा वापर

संशयित काजल हिच्याकडून गुंगीचे औषध असलेल्या पुढ्या आणि औषध मिसळविलेले पेढे सापडले आहेत. एका पेढ्यात वा जेवणात एकाचवेळी १० गोळ्यांचे एकच औषध दिले जायचे. त्यामुळे काही मिनिटांमध्ये समोरचा व्यक्ती बेशुद्ध व्हायचा.

त्याला पुन्हा शुद्धीवर येण्यासाठी तब्बल तीन दिवसांपेक्षा जास्तीचा काळ लागायचा. त्यापर्यंत हे संशयित लांबवर पसार व्हायचे. एका गुन्ह्यातील फिर्यादी गेल्या तीन दिवसांपासून बेशुद्ध असून, आता कुठे तो काहीसा सावरत असल्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सांगितले.