
Nashik Crime News : डिझेल चोरट्यांच्या टोळीला अटक; येवला तालुका पोलिसांनी लावला छडा
Nashik News : राज्य परिवहन महामंडळाच्या येवला आगाराच्या बसमधून डिझेल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा तालुका पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी चौघांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Gang of diesel thieves arrested nashik crime news)
तालुका पोलिस ठाण्यात राजापूर येथील बसमधील डिझेल चोरीच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नाशिक ग्रामीण तसेच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
सहायक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, सहायक निरीक्षक एकनाथ भिसे, पोलिस हवालदार माधव सानप, ज्ञानेश्वर हेंबाडे, राजेंद्र केदारे, सचिन वैरागर, ज्ञानेश्वर पल्हाळ, संतोष जाधव, सागर बनकर, आबासाहेब पिसाळ यांच्या पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळी निरीक्षण केले.
त्यानुसार बस पार्किंग येथील ठिकाणी प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून गोपनीय माहितीनुसार गुन्ह्यातील मास्टर माईन्ड अमोल भाऊसाहेब कोटमे (२६, रा. कोटमगांव विठ्ठलाचे, ता. येवला) यास ताब्यात घेत सखोल चौकशी करण्यात आली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
कोटमे याचे साथीदार विजय गणपत जाधव (३७, रा. गोंदवणी रोड, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ह. रा. पद्मकुंज, अंगणगाव, ता. येवला), शुभम संदीप गायकवाड (२०, रा. कोटमगाव खु. ता.येवला), राजेंद्र ऊर्फ बंडू अशोक कोटमे (३०, रा. कोटमगांव विठ्ठलाचे, ता.येवला) यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून शोध घेऊन ताब्यात घेतले. संशयित चोरट्यांनी राजापूर (ता. येवला) येथे बसमधील डिझेलची चोरी केल्याची कबुली दिली. लूटमार करणाऱ्यांपैकी एक साथीदार फरार आहे.
संशयितांकडून डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणा-या पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार व ७० लिटर चोरी केलेले डिझेल, चोरीचे साहित्य असा एकूण ३ लाख ७० हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांवर दिंडोरी, गंगापूर, वणी, लासलगाव येथील गुन्ह्यात सहभागा आहे का याचा तपास केला जात आहे. येवला तालुका पोलिसांनी डिझेल चोरीचे तीन गुन्हे उघड केले असून इतर गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.