
Nashik News: अण्णासाहेबांच्या उपस्थितीत उद्या गंगापूजन, आरती; 50 वर्षांची अखंड परंपरा कायम
Nashik News : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व पुरोहित संघातर्फे गेल्या पन्नासपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेला गंगापूजनाचा सोहळा शनिवारी (ता.२७) मंगलमय व भावपूर्ण वातावरणात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होत आहे.
यानिमित्त आज चंद्रकांतदादा मोरे यांच्या उपस्थितीत रामकुंड परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सेवेकऱ्यांनी त्यासाठी मोठी उपस्थिती होती. (Ganga Pujan Aarti tomorrow in the presence of Annasaheb 50 years of uninterrupted tradition Nashik News)
ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून दशमी असे दहा दिवस भारतभर गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीनुसार आपण नद्यांना मातेचा सन्मान दिला आहे. नदी जीवसृष्टीला सजीवत्व देते.
पवित्रता, शुद्धता, निर्मळता, प्रक्षालन, परिष्कार, संयम, परोपकार, पापमुक्ती या सर्वांचं प्रतीक आपण गंगा गोदा मातेस मानतो. या मातेशी आपले मानसिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक दृढ भावबंध युगानुयुगे घट्ट रुजले आहेत, म्हणूनच समस्त प्राणिमात्र आणि जीवसृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या गंगा गोदावरी मातेचे यथासांग पूजन करून तिचा सन्मान केला जातो.
गंगापूजनाच्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रकल्याण, राष्ट्ररक्षण, सर्व जीवसृष्टीच्या कल्याणाचे साकडे गुरुमाऊली व उपस्थित सेवेकऱ्यांतर्फे गोदामाईस घालतील आणि मंत्रघोषात यथासांग गंगापूजन सर्वांकडून करून घेतले जाईल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याप्रसंगी उपस्थित सेवेकरी व भाविकांशी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हितगूज करतील."गोदामाई त्र्यंबकेश्वरी अवतरीत होऊन आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रीस सागराला मिळते. तिने आपल्या तीरावरील दीड हजार किलोमीटरचा परिसर सर्वार्थाने सुजलाम सुफलाम केला आहे.
आपण गोदामाईच्या माध्यमातून पर्जन्यराजास विनंती केली तर तो निश्चितच आपणावर कृपा करतो. पर्जन्यराजाने कृपा करून सर्व जीवसृष्टीला नवचैतन्य द्यावे, विशेषतः शेतकरी सुखी, संपन्न व्हावा आणि शेतकरी राजाच्या आत्महत्या थांबाव्यात अशी भावना गोदामाईकडे व्यक्त केली जाईल.
गावागावात नदीचा सन्मान
या सोहळ्यानिमित्त आज सेवेकरी वर्ग गोदामाई आणि आपापल्या गावातील नदीवर जाऊन गंगापूजन करून सन्मान करतील, तसेच या दशहरा पुण्यकाळात आपापल्या गावातील नदी, नाले, तलाव स्वच्छ करून वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम सुद्धा महिला पुरुष सेवेकऱ्यांनी हाती घेतला आहे.