
Nashik Ganeshotsav News : रहीम शेख यांच्याकडून ऐक्याचे दर्शन; छगन भुजबळांकडून कौतुक
Nashik Ganeshotsav News : सर्वधर्मसमभाव जपत पुरणगाव (ता. येवला) येथे रहीम (मुन्ना) शेख या मुस्लिम तरुणांकडून गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली.
त्यांच्या घरचा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक दररोज येत आहे. शनिवारी (ता. २३) मंत्री छगन भुजबळ यांनी देखील श्री. शेख यांच्या घरी भेट देत श्री गणेशाचे पूजन करत दर्शन घेवून कौतुक केले. (Ganpati Bappa was established by Rahim Shaikh nashik ganeshotsav news)
यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, गणेश उत्सवाच्या माध्यमातून मुन्ना शेख यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम जोपासली आहे. त्यांच्या कुटुंबाच हे सामाजिक ऐक्याचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. यापुढील काळातही त्यांचे हे काम सुरू राहील असे सांगत त्यांना या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, विनोद ठोंबरे यांच्यासह शेख कुटुंबातील सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वधर्म समभाव जपत रहीम शेख या तरुणाने आपल्या घरामध्ये गेल्या पाच वर्षापासून गणरायाची स्थापना करत आहे. रहीमला पहिल्या दोन मुली होत्या. मुलगा व्हावा म्हणून रहीमने गावातीलच गणरायाच्या मंदिरात नवस केला होता.
गणरायाने देखील रहीमची प्रार्थना ऐकले. त्यांना मुलगा झाला. त्यामुळे रहीमची हिंदू धर्मातील देवता असलेला गणपती बाप्पा श्रद्धा वाढली असून तो मनोभावे घरामध्ये भक्तीभावाने गणपती बाप्पाची स्थापना करतो.