उमराणे येथे झोपडीत गॅसचा स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तू जळून खाक; मुलीसह वृद्ध महिला जखमी : Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burned House

Nashik News : उमराणे येथे झोपडीत गॅसचा स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तू जळून खाक; मुलीसह वृद्ध महिला जखमी

उमराणे (जि. नाशिक) : उमराणे येथील सुनील महादू माळी यांच्या झोपडीत गॅसचा (Gas) स्फोट होऊन सर्व संसार उपयोगी वस्तू, साठ हजार रुपये रोख व अन्नधान्य जळून खाक झाले. (Gas explosion in hut in Umrane household goods burnt Nashik News)

बबीता पोपट माळी यांच्या घरात गॅस स्फोटामुळे आग लागून एका बारा वर्षाच्या मुलीसह वृद्ध महिला भाजून जखमी झाली. ही घटना आज दुपारी साडेतीन ते साडेचार सुमाराला घडली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सपना पोपट माळी, जिजाबाई महादू माळी अशी जखमींची नावे आहेत.

सुनील माळी हे मोलमजुरी करतात. भावजय गावात काही कामानिमित्त आले असता घरी हा प्रकार घडला. गॅस रेग्युलेटरमधून अचानक आग भडकली. त्या आगीने गंभीर स्वरूप धारण केले. आगीत घरकुल बांधकामासाठी घेतलेले बचत गटाचे ४० हजार रुपये व घरकुलाचा पुढील हप्ता ४० हजार असे रोकड ८० हजार रुपये जळून खाक झाले. त्याचबरोबर संसार उपयोगी वस्तू व आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे आगीच्या भक्षस्थानी आली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेजारील तरुणाने गॅस सिलेंडरवर ओली गोधडी टाकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर भारत पेट्रोलियमचे वितरक, तलाठी गणेश जाधव, ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण अहिरराव यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली.

हातावरचे पोट 

तानाजी महादू माळी व विधवा बबीता पोपट माळी शेतीकाम व मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्यामुळे घरकुलाचा तिसरा हप्ता ४० हजार व गुरुकुल बांधकामासाठी बचत गटाकडून घेतलेली अर्थसहाय्य ४० हजार अशे एकूण ८० हजार रुपये जाळून खाक झाले. त्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. डोळ्यासमोर सर्व संसार आगीच्या भक्षस्थानी आल्यामुळे आज ते उघड्यावर आले आहेत. त्यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.