Corona Effect : कोरोनाची चर्चा मटणाला लाभदायी!... दर वाढूनही मटण विक्रेत्यांकडे खवय्यांची गर्दी

meat shop.jpg
meat shop.jpg

नाशिक : (मालेगाव) कोरोना विषाणूची चर्चा बोकडाच्या मटणाला मात्र लाभदायी ठरत आहे. शहरासह ग्रामीण भागात मटणाची मागणी जोरदार वाढली आहे. बोकडांच्या किमती वधारल्या असून, मटणाने आठवडाभरातच साडेपाचशे रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. दोन आठवड्यांपूर्वी 450 ते 480 रुपये किलो असलेल्या मटणाच्या दरामागे थेट 60 ते 80 रुपये वाढ झाली आहे. यामुळे खवय्यांच्या खिशाला मोठी झळ बसली असून, सध्या 560 रुपये किलो दराने मटणाची विक्री होत आहे. 

दर वाढूनही मटण विक्रेत्यांकडे कायमच खवय्यांची गर्दी

मटणासाठी आवडीचा असणारा रविवार खर्च वाढल्याने ना आवडीचा झाला आहे. ग्रामीण भागात शेळी, बोकडपालन करणाऱ्यांना यामुळे चांगलीच संधी उपलब्ध झाली आहे. बोकडाचे मटण खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातूनच मटणाच्या दराचा आलेख वाढता आहे. दर वाढूनही मटण विक्रेत्यांकडे कायमच खवय्यांची गर्दी असते. कसमादे व परिसरात ताजे व खात्रीशीर मटण मिळण्याची ख्याती असलेल्या प्रसिद्ध मटण विक्रेत्यांच्या दुकानासमोर सातत्याने रांगा दिसतात. विभागात जळगाव (नि.), सोयगाव, मालेगाव कॅम्प, देवळा येथील मटण विक्रेत्यांची जिल्ह्यात चर्चा आहे. या सर्व प्रसिद्ध दुकानांवर सध्या 560 ते 580 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. बोकड महाग झाल्याने मटणाचे भाव वाढल्याचे देवळा येथील मटण व्यावसायिक प्रताप सांबरे यांनी सांगितले. 

सोयगाव व कॅम्प येथील मटण विक्रेत्यांकडे सातत्याने गर्दी

प्रामुख्याने शहरी भागात सर्रास शेळीचे मटण बोकडाचे मटण म्हणून विक्री होते. खाटीक बांधव ग्रामीण भागातून व आठवडे बाजारातून सर्रास बोकड, शेळी खरेदी करतात. ग्रामीण भागात मोजकेच ग्राहक असल्याने शेळीचे मटण विक्री करण्यास विक्रेते घाबरतात. खात्रीशीर मटण घेण्यासाठी शहरातील असंख्य खवय्ये शहरानजीक च्या खेड्यांवर जातात. त्यातूनच महापालिका क्षेत्रातील सोयगाव व कॅम्प येथील मटण विक्रेत्यांकडे सातत्याने गर्दी असते. जळगाव निं. येथील अश्रफ खाटीककडील मटणही प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतील दहा गावांतून येथे मटण खरेदीसाठी ग्रामस्थ येतात. ग्रामीण भागात काही गावांत प्रतिकिलोचा दर 480 ते 520 रुपये किलो आहे. बोकडांच्या किमती वधारल्याने दर वाढविल्याचे विक्रेते सांगतात. ग्रामीण भागात अल्पभूधारक शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळी, बोकडपालन करतात. ठराविक किलो वजनाचा बोकड झाल्यास त्याची विक्री केली जाते. या व्यवसायातून महिलांच्या घरखर्चाला मोठा हातभार लागतो. 

25 ते 30 किलो वजनापर्यंतचे बोकड वाढवून विक्री

सध्या किमती वधारल्याने बोकडविक्री करण्याऐवजी वाढविण्यावर भर देत असल्याचे शेळीपालन करणाऱ्या महिलांनी सांगितले. गावठी बोकड साधारणत: 15 ते 20 किलो वजनाचे असतात. यापूर्वी ते पाच ते सहा हजार रुपयांप्रमाणे मिळत होते. सध्या हेच बोकड आठ ते दहा हजार रुपये भावात मिळत असल्याचे बद्रुद्दीन खाटीक यांनी सांगितले. राजस्थानी बोकड 35 ते 40 किलो वजनापर्यंत वाढतात. गोटफार्ममधील व्यावसायिक 25 ते 30 किलो वजनापर्यंतचे बोकड वाढवून विक्री करतात. बकरी ईदच्या कुर्बानीसाठीचे बोकड आम्ही विशेष काळजी घेत खुराक घालून शंभर किलो वजन होईपर्यंत देखील वाढवतो, असे प्रमोद निकम यांनी सांगितले. 

गावठी बोकडांच्या मटणासाठी देवळा प्रसिद्ध 

देवळा येथे खास गावठी बोकडांचेच मटण असते. कोणत्याही प्रकारे भेसळ केली जात नाही, स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या पंचक्रोशीत देवळ्याचे मटण प्रसिद्ध आहे. येथून सटाणा, कळवणसह थेट नाशिकपर्यंत प्रवासी मटण खरेदी करून नेतात. या मटणाची चवच वेगळी असल्याचे खवय्ये सांगतात. देवळा येथे गावठी बोकडऐवजी अन्य बोकड तसेच शेळीचे मटण आढळून आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे येथे भेसळ करण्यास कोणीही धजावत नाही. 

वातानुकूलित मटण शॉप 

शहरातील कॅम्प भागात पोलिस वसाहतीजवळील साई बाजार व्यापारी संकुलात सद्दाम कुरेशी यांचे इंडियन मटण शॉप वातानुकूलित आहे. या दुकानात मध्यवर्ती वाता नुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. बोकड कटींगसाठी स्वतंत्र खोली करण्यात आली आहे. कचरा, सांडपाणी वाहून जाण्याची वेगळी सोय असल्याने येथील स्वच्छता, ताजे व खात्रीचे मटण यामुळे या दुकानावर सतत रांगा लागलेल्या असतात. शहरातील हे पहिले वातानुकूलित मटण शॉप आहे. 

मासळी बाजारातही गर्दी 

मांसाहारी हॉटेलमध्ये सध्या मटण थाळीला चांगलीच डिमांड आहे. विविध हॉटेलमध्ये महिन्यापासून खासकरून मटण थाळीचा मेन्यू सुरू करण्यात आला आहे. त्याचा दर 180 ते 210 रुपयांपर्यंत आहे. माशांनाही खवय्ये प्राधान्य देत आहेत. रामसेतू व मच्छी बाजारातील मासळी बाजारात गर्दी दिसून येते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com