Nashik News: करंजगावत गोदापात्राचा मोकळा श्वास; सायखेडा परिसरात परिस्थिती अजूनही जैसे थे | Godapatra clear without panveli at Karanjgaon situation in Saikheda area still same Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Godavari vessel freed from Panvellis by the department by removal of Panvellis from Karanjgaon.

Nashik News: करंजगावत गोदापात्राचा मोकळा श्वास; सायखेडा परिसरात परिस्थिती अजूनही जैसे थे

Nashik News : निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या करंजगाव व परिसरात गोदापात्रात पानवेलींचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य दूषित पाण्यामुळे धोक्यात आले होते. याबाबत करंजगावचे माजी सरपंच व राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी पाटबंधारे विभागाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या संपूर्ण पानवेली हटविल्या गेल्या आहेत.

सुमारे दीड ते दोन किमी पसरलेल्या पानवेली काढल्यामुळे गोदावरीच्या गोदापात्राने मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे करंजगावकर नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे. (Godapatra clear without panveli at Karanjgaon situation in Saikheda area still same Nashik News)

दरवर्षी गोदावरी नदीच्या गोदापात्रात पानवेलीमुळे पाणी प्रदूषित होऊन साथीचे रोग वाढतात. वारंवार पाठपुरावा करूनही यंदा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने खंडू बोडके-पाटील यांनी मागील महिन्यात चांदोरी येथे वाळू डेपो उद्‌घाटनप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच घेराव घालत जाब विचारला होता.

त्यामुळे तातडीने पानवेली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. करंजगाव व दारणासांगवी नदीपात्रातील पानवेली काढण्यास प्रशासनाला यश आले आहे.

मात्र सायखेडा येथील पानवेली अतिशय संथ गतीने काढण्यात येत असल्याने खंडू बोडके पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, यांत्रिकी विभाग कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पावसाआधी सायखेडा पुलाला अडकलेल्या संपूर्ण पानवेली काढण्याचे आश्वासन जितेंद्र पाटील यांनी खंडू बोडके पाटील यांना दिले आहे. सदर पानवेली गतीने काढण्यासाठी उपअभियंता दीपक पाटील व राजेश गढे यांच्यावर जबाबदारी सोपवल्याची माहिती जितेंद्र पाटील यांनी खंडू बोडके पाटील यांना दिली.

"गोदाकाठच्या नदीपात्रात पानवेली साचल्याने पाणी प्रदूषित होते. नाशिक शहरातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे पानवेली वाढत असल्याने त्यावर उल्हास नदीच्या धर्तीवर कायमस्वरूपी तोडगा प्रशासनाने काढावा. वारंवार पाठपुरावा करून करंजगाव नदीपात्र पानवेलीमुक्त झाले आहे. सायखेडा येथील पुलाला अडकलेल्या पानवेली अतिशय संथ गतीने काढण्यात येत असून त्यालाही प्रशासनाने गती द्यावी." - खंडू बोडके-पाटील माजी सरपंच, करंजगाव

टॅग्स :Godavari River