Nashik Crime News : तहसीलच्या वाहनचालकाने दीड लाखांची घेतली लाच; अधिकाऱ्याच्या नावाचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : तहसीलच्या वाहनचालकाने दीड लाखांची घेतली लाच; अधिकाऱ्याच्या नावाचा वापर

नाशिक : मौजे शिरसाठे (ता. इगतपुरी) येथील शेतजमिनीच्या वादासंदर्भातील तक्रारदाराकडे दोन लाखांच्या लाचेची मागणी करून दीड लाखांची लाच (Bribe) स्वीकारणाऱ्या शासकीय वाहनचालकास अटक करण्यात आली आहे. (govt vehicle driver accepted bribe of 1 lakh from complainant in relation to agricultural land dispute was arrested nashik crime news)

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर उपविभागीय कार्यालयात शासकीय वाहनचालक असलेल्या अनिल बाबूराव आगिवले (वय ४४) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई शनिवारी (ता. ४) रात्री करण्यात आली. दरम्यान, संशयित लाचखोर आगिवलेने बदलून गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करून ही रक्कम घेतल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

वाडीवऱ्हे येथील तक्रारदारांनी मौजे शिरसाठे (ता. इगतपुरी) येथे गट क्रमांक १७६ मधील शेतजमीन विकत घेण्याकरिता विसार पावती नोटरी केली होती. या शेतजमिनीच्या संदर्भात तत्कालीन इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वाद चालू होता.

या वादाचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने करून देण्याच्या मोबदल्यात संशयित आगिवले याने गेल्या २४ फेब्रुवारीला दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये यापूर्वी घेतल्याचे लाचखोर आगिवले याने मान्य केले आहे.

उर्वरित एक लाख ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम लाचखोर आगिवले याने पंच, साक्षीदारासमक्ष तक्रारदारांकडून शनिवारी (ता. ४) स्वीकारली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पंकज पळशीकर, प्रकाश महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांनी केली.

लाच कुणाच्या सांगण्यावरून?

संशयित लाचखोर आगिवले यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराच्या शेतजमिनीसंदर्भातील वादाचा निकाल यापूर्वीच लावण्यात आलेला आहे.

तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांची बदलीही महिनाभरापूर्वीच झालेली आहे. तरीही संशयित लाचखोर आगिवले याने संबंधित अधिकाऱ्याचे नाव वापरून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. त्यामुळे लाच

कुणाच्या सांगण्यावरून घेतली, याचा शोध घेण्याचे आव्हान तपास पथकासमोर आहे. दरम्यान, शेतजमिनीच्या वादाचा निकाल देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने संशयित वाहनचालक आगिवले याच्यामार्फत लाचेची रक्कम मागितल्याचे समजते. ही बाब चौकशीतून समोर आल्यास मोठा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.