Grapes Crisis : द्राक्षानेही शेतकऱ्यांना दिला दणका! भाव घसरल्याने 12 कोटींचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tensed farmer due to grapes crisis

Grapes Crisis : द्राक्षानेही शेतकऱ्यांना दिला दणका! भाव घसरल्याने 12 कोटींचा फटका

नाशिक : द्राक्षांचा हंगाम सुरु झाला असताना एक आठवड्यापूर्वी धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा आता डोके वर काढले आहे. अवकाळीचे संकट एकीकडे डोक्यावर असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना १२ कोटींचा दणका बसला आहे.

त्यातच, बांगलादेशमधील कर काही केल्या कमी झाला नसल्याने किलोला २० रुपये कमी भावाने शेतकऱ्यांना द्राक्षे द्यावे लागत आहेत. (Grapes gave farmers shock 12 crore hit due to falling prices nashik news)

बांगलादेशसाठी गेल्यावर्षी ६० ते ६२ रुपये किलोने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना द्राक्षे दिली होती. आता ४० ते ४२ रुपये भावावर समाधान मानावे लागत आहे. गतवर्षी इंग्लंडसाठी ७० ते ७५ रुपये किलो, तर युरोपसाठी ५० ते ७० रुपये किलोने द्राक्षे विक्री झाले होते.

आताच्या हंगामात इंग्लंडसाठी ६० ते ६२, तर युरोपसाठी ४५ ते ५५ रुपये किलो असा भाव मिळतो आहे. एका आठवड्यामध्ये द्राक्षांचा किलोचा भाव दहा रुपयांनी कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

हे कमी काय म्हणून रद्दीपेक्षा कमी भावात द्राक्षे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. स्थानिक बाजारपेठेत लांब आकाराच्या द्राक्षांना ३० ते ३२ आणि गोल आकाराच्या द्राक्षांना २० ते २२ रुपये किलो असा भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी पॅकिंगसाठी खरेदी कराव्या लागणाऱ्या रद्दीचा भाव किलोला ३५ ते ४० रुपयांपर्यंत आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

३८ हजार टन द्राक्षांची निर्यात

इंग्लंडसह युरोपियन बाजारपेठेत आतापर्यंत नाशिकमधून ३८ हजार २० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. याशिवाय सांगलीतून १ हजार ८६९, सातारामधून ७०८, नगरमधून २१४, पुण्यातून १७४ टन द्राक्षे इंग्लंडसह युरोपच्या बाजारात पाठवण्यात आली आहेत.

राज्यातून आतापर्यंत ३ हजार ९९ कंटेनरमधून ४१ हजार १०९ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. दरम्यान, मागील आठवड्यातील अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मणी तडकल्याचे चित्र आता पाहावयास मिळू लागले आहे. आताच्या अवकाळी पावसामुळे आणखी कोणत्या समस्येला सामोरे जावे लागणार याबद्दलची धाकधूक द्राक्ष उत्पादकांमध्ये आहे.

"अवकाळी पाऊस, ढगाळ हवामानामुळे द्राक्षांच्या मण्यांमधील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. निर्यातीसाठी द्राक्षांच्या काढणीचा वेग मंदावला आहे. मुळातच, द्राक्षांच्या उत्पादनासाठी किलोला २० ते २५ रुपये खर्च येत असून त्यापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांना द्राक्षे विकावी लागत आहेत. मात्र छाटणी विखुरली गेल्याने अखेरच्या टप्प्यात द्राक्षे बाजारात जाण्याचे प्रमाण सुरळीत राहील, अशी स्थिती दिसते आहे." - कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ.