Dada Bhuse: ‘ट्रेलर’ त्यांनी दाखवला ‘पिक्चर’ मी दाखवतो! पालकमंत्री भुसेंचे विरोधकांना थेट आव्हान | Guardian Minister Dada Bhuse direct challenge to opposition nashik political news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse

Dada Bhuse: ‘ट्रेलर’ त्यांनी दाखवला ‘पिक्चर’ मी दाखवतो! पालकमंत्री भुसेंचे विरोधकांना थेट आव्हान

Dada Bhuse : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील पराभव पालकमंत्री दादा भुसे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

बाजार समितीत विरोधकांनी आम्हाला ‘ट्रेलर’ दाखवला; पण येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू, असे म्हणत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे. (Guardian Minister Dada Bhuse direct challenge to opposition nashik political news)

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्या वेळी पालकमंत्री भुसे म्हणाले, कांदा व टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे भाव घसरले आहेत.

महाराष्ट्रासह गुजरातची बाजारपेठही काही दिवस बंद राहिल्यामुळे ही घसरण झाली. आवक नियंत्रणात राहिली तर बाजारभाव स्थिर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाजार समितीच्या निवडणुकीविषयी त्यांना विचारले असता, भुसे म्हणाले, जनता जनार्दनाने दिलेला कौल आम्ही मान्य करतो.

या एका निवडणुकीचा ‘ट्रेलर’ त्यांनी दाखवलेला असला तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही त्यांना ‘पिक्चर’ दाखवू, असे आव्हानच त्यांनी दिले. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. उर्वरित टप्पाही वेळेत पूर्ण करून नागरिकांसाठी हा रस्ता खुला केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यात सामाजिक सलोखा टिकून राहील

त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिराच्या परिसरात घडलेली घटना असेल किंवा कसबे सुकेणे येथील दंगल, अशा घटनांमुळे सामाजिक ऐक्याला गालबोट लागते. अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिस आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत.

त्यातील उपायांची माहिती सार्वजनिकरीत्या देणे योग्य नाही. त्याची अंमलबजावणी करणे हा प्राधान्यक्रम आहे आणि आपण ते करत असल्याचे पालकमंत्री भुसे म्हणाले.

टॅग्स :Nashikdada bhuse