H3N2 Virus : जिल्ह्याच्या वेशीवर ‘एच-३, एन-२’ रुग्ण! आरोग्य विभाग अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flu H3N2

H3N2 Virus : जिल्ह्याच्या वेशीवर ‘एच-३, एन-२’ रुग्ण! आरोग्य विभाग अलर्ट

नाशिक : काही दिवसांपासून वातावरणातील बदल आणि नव्याने आलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन सर्दी-खोकला, ताप-थंडीचे रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढले असून, रुग्ण झपाट्याने वाढत आहे.

यातच नाशिक जिल्ह्याच्या नगर आणि ठाणे या वेशीवर ‘एच-३, एन-२’ चा रुग्ण आढळल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, तपासण्या वाढविल्या आहेत. (H3N2 patients district Health Department Alert nashik news)

दोन आठवड्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस अन्‌ त्यानंतर वातावरणात बदलामुले थेट परिणाम मानवी आरोग्यावर झाला आहे. प्रामुख्याने लहानांपासून मोठ्यापर्यंत विपरीत परिणाम होत आहे. घसादुखीपासून सुरवात होऊन थंडी- ताप, सर्दी- खोकल्याचा त्रास होत आहे.

शहरापाठोपाठ ग्रामीण भागात या रुग्णांची संख्या वाढली आहे. थंडी वाजून ताप येणे, घसादुखीनंतर सर्दी व खोकला येतो. ही प्राथमिक लक्षणे आल्यानंतर उपचार सुरू केल्यानंतर साधारणत चार दिवस त्रास होईल.

तसेच, त्यानंतर बारीक ताप राहू शकतो. त्याचप्रमाणे, खोकल्याचा त्रास आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांनी या काळात घराबाहेर जाणे टाळावे, गर्दीत जाऊ नये, घराबाहेर जावे लागलेच तर मास्कचा वापर करावा व कोरोनाकाळात पंचसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आलेले आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्शल नेहेते यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, डोकेदुखीच्या तक्रारी आहेत, मात्र त्या तक्रारी व्हायरलच्या आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांच्या जानेवारीपासून आतापर्यंत २१ स्वॅब देण्यात आले होते.

सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले असल्याने भीती नाही. तरीदेखील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सोमवारी (ता. २०) जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत एकवीसने वाढ झालेली आहे. यात नाशिक महापालिकेमध्ये १२, ग्रामीण भागात आठ, तर जिल्हाबाह्य एक रुग्णाचा समावेश आहे. तसेच आज एकूण उपचाराखालील रुग्णांची संख्या ५० झाली आहे.

"वातावरणातील बदलाचा परिणामामुळे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्णांत वाढ झाली आहे. रुग्णांनी घाबरून न जाता कोरोनातील पंचसूत्रीचा वापर करावा. गर्दी टाळावी, मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावेत, संतुलित आहार घ्यावा आणि पुरेशी झोप घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून तपासण्या वाढविल्या आहेत." - डॉ. हर्शल नेहते, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद