
नाशिक शहरातील निम्मे सिग्नल अतिसंवेदनशील यादीत
नाशिक : शहरांमध्ये मेट्रो निओ सर्वेक्षण होत असताना वाहतूक ठप्प होत असलेल्या भागात केलेल्या पाहणीत शहरातील एकूण सिग्नलपैकी जवळपास निम्मे सिग्नल वाहतुकीच्या दृष्टीने अतिसंवेदनशीलता यादीत टाकण्यात आले आहे. वाहतुकीच्या हॉटस्पॉटच्या ठिकाणी आत्ताच उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गांची निर्मिती आवश्यक राहणार आहे.
...म्हणून खासगी वाहनांची वाढतेय संख्या
शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना वाहतुकीची समस्यादेखील तितक्याच वेगाने वाढत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे ध्वनी, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात प्रतिदिन रस्त्यावर दुचाकी वाहने तीन लाखांच्या आसपास, तर पाऊण लाखांच्या आसपास तीन चाकी व चार चाकी वाहने रस्त्यावर धावतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
नाशिकमध्ये टायर बस मेट्रो येणार?
महापालिकेने (NMC) बससेवा सुरू केली असली तरी संपूर्ण शहराला सामावून घेण्याची क्षमता अद्यापही त्या सेवेत नाही. त्यामुळे राज्यातील भाजपच्या सत्ताकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नाशिकमध्ये मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मेट्रो सुरू करण्यापूर्वी वाहतुकीचे सर्वेक्षण करण्यात आले. मेट्रोसाठी ताशी वीस हजार प्रवाशांची आवश्यकता असते, परंतु नाशिकमध्ये ताशी १६ हजार प्रवासी उपलब्ध होत असल्याने मेट्रोच्या निकषांमध्ये बसत नाही. त्यामुळे नाशिकमध्ये टायर बस मेट्रोचा निर्णय घेण्यात आला.
वाहतुकीचे ४३ हॉटस्पॉट
मेट्रोसाठी सर्वेक्षण होत असतानाच वाहतुकीचे हॉटस्पॉट शोधण्यात आले. त्यात ४३ हॉटस्पॉट निदर्शनास आले. वाहतुकीच्या त्या हॉटस्पॉट वर सध्या सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. यातील वीस सिग्नल वाहतुकीच्या दृष्टीने अतिसंवेदनशीलतेच्या यादीत टाकण्यात आले असून या भागात आताच नियोजन न केल्यास वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली.
उड्डाणपूल भुयारी मार्गांची गरज
वाहतुकीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील ठरणाऱ्या भागात सद्यःस्थितीत सिग्नल यंत्रणेच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणात आणली जाते. सिग्नलवर दोन मिनिटांसाठी एका बाजूचा थांबा असतो. त्या दरम्यान जवळपास अर्धा ते एक किलो मीटर वाहनांच्या रांगा लागतात. शहरात वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच नियोजनाची आवश्यकता आहे.
हेही वाचा: Nashik : महानगरपालिका क्षेत्रात विकासकामांसाठी 10 कोटी मंजुर
या भागात उड्डाणपूल गरजेचा
सिटी सेंटर मॉल, एबीबी सर्कल, गडकरी चौक ते मेहेर सिग्नल, उपनगर, फेम सिनेमा या सिग्नलवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असल्याने उड्डाणपुलाची आवश्यकता निर्माण झाली आहे. द्वारका, बिटको, तारवाला नगर, नागजी हॉस्पिटल, जुने पोलिस आयुक्तालय, डॉ. आंबेडकर नगर, गंगापूर नाका येथील सिग्नलवर आतापासूनच नियोजन न केल्यास येथील व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: नाशिक : स्त्रीधन वगळता सर्वच मालमत्तांवर येणार टाच
Web Title: Half Signals Are In Nashik City The Sensitive List Due To Traffic Jam Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..