
Haushi Rajya Natya Spardha : राजकारणातील काळी बाजू मांडणारे ‘अबीर गुलाल’
नाशिक : उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ‘अबीर गुलाल’ नाटकातून राजकारणातील काळी बाजू दाखवण्यात आली आहे. कुठल्याही परिस्थितीत सत्ता राहिली पाहिजे, अशी महत्वाकांक्षा बाळगणारे संभाजी पाटील यांच्या घरात तीन पिढ्यांपासून राजकारण चालते.
मात्र, नवीन व्यक्ती राजकारणात एन्ट्री करणार म्हटल्यावर त्यांचा डाव उद्ध्वस्त करण्यासाठी खेळलेली खेळी म्हणजे हे नाटक होय. (Haushi Rajya Natya Spardha Abir Gulal presents dark side of politics nashik news)
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बुधवारी (ता. ८) महाकवी कालिदास कलामंदिरात अबीर गुलाल हे नाटक सादर झाले. शकुंतलादेवी सामाजिक विकास संस्था, लातूर या संस्थेने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक मिलिंद शिंदे आहेत.
प्रशांत जानराव हे दिग्दर्शक आहेत. दोन अंकी नाटकात पहिल्या अंकात सुशिक्षित विद्याला पक्षाकडून उमेदवारी जाहीर होते. पण पारंपारिक उमेदवार संभाजी पाटील यांना हे काही पटत नाही.
आपल्यालाच उमेदवारी मिळावी किंवा घरातील उमेदवार निवडून यावा यासाठी संभाजी हे विद्याशी विवाह करतात. विवाहानंतर विद्याला तिच्या प्रियकरापासून दिवस गेल्याची अफवा संभाजी पसरवितो. तसेच, तिला खोट्या खटल्यातही अडकवतो.
त्यामुळे विद्याची उमेदवारी रद्द होते आणि पुन्हा संभाजीला उमेदवार म्हणून जाहीर करावे लागते. राजकारण म्हटले की शिव्या आणि पाटील घराणे याच्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
संभाजी बिनविरोध निवडून आल्यानंतर त्याच्यावर हल्ला होतो आणि त्याला आपल्या चुकीचा पश्चात्ताप व्हायला लागतो. पण त्यातही राजकारण करून विद्याला आयुष्यातून उठवून विरोधकांनी हे कृत्य घडविल्याची काळी बाजू दाखवण्यात दिग्दर्शकास यश आल्याचे दिसून येते.
संभाजीची भूमिका कानिफनाथ सुरवसे यांनी तर विद्याची भूमिका मंजूषा पाठक यांनी साकारली. त्याचे सहकलाकार म्हणून आश्विन गायकवाड, प्रशांत जानराव, बाळासाहेब ढगे, महेंद्र कांबळे, अमोल साळुंखे, अनिता नागमोडे, दिनेश ठाकूर, अतुल पावडे, अमोल काळे यांनी भूमिका साकारली. प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची तर पार्श्वसंगीत राजेश शिंदे यांचे होते.
अनिता नागमोडे व महादेव गडदे यांनी नेपथ्य सांभाळले. चंद्रकांत खाडे यांनी रंगभूषा व सविता आरकेडी व श्रीदेवी सौदागर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली.
आज अर्यमा उवाच,
गुरुवारी (ता. ९) दुपारी ४ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे अर्यमा उवाच हे नाटक सादर होणार आहे. जावखेडे (ता. एरंडोल) येथील समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे हे नाटक आहे. सोमनाथ नाईक लिखित व विशाल जाधव यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे.
तर परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रात्री ८ वाजता तेरे मेरे सपने हे नाटक सादर होईल. समर्पित फाउंडेशन, सोलापूर या संस्थेचे हे नाटक असून इरफान मुजावर हे नाटकाचे लेखक आहेत.