
Saptashrung Gad : सप्तशृंगगडावर आरोग्य अन् सुरक्षेला प्राधान्य; 92 जवान तैनात
Saptashrung Gad : देशातील ५१ शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ आणि खानदेशवासीयांची कुलदेवी श्री सप्तशृंग निवासिनी देवी भक्तांच्या सेवा-सुविधांसाठी विकासकामांचा श्रीगणेशा झालाय. तंत्रज्ञानाचा वापर करत असतानाच प्राथमिक आरोग्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी तलाव व टाकीचे काम प्रस्तावित असून, भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. (Health and safety priority at Saptashrung Gad 92 jawans deployed nashik news)
आदिमायेच्या मूर्तिसंवर्धनातून कवच लेपन काढल्यानंतर श्री भगवतीची मूळ स्वयंभू मूर्ती भाविकांपुढे आलीय. त्या वेळी गडावर भगवतीच्या चरणी लीन होण्यासाठी भाविकांची वर्दळ वाढली आहे.
हीच बाब लक्षात घेऊन भाविकांच्या सोयी-सुविधांवर प्रशासकीय यंत्रणा आणि श्री सप्तशृंग निवासिनी देवी विश्वस्त मंडळासह ग्रामपंचायतीने विविध विकासकामे हाती घेतली आहेत. चैत्राप्रमाणे नवरात्रातोत्सवात लाखो भाविक पायी दर्शनाला येतात.
नवसाला पावणारी देवी, अशी श्रद्धा असल्याने नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. वर्षभरात जवळपास पन्नास लाखांवर अधिक भाविक गडावर येतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन साडेसात कोटींच्या मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाची अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
श्री भगवती मंदिराच्या सभामंडपाचे नवीन स्वरूपात तंत्रज्ञानाचा वापर करून तीन हजार ७५० चौरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘बेसाल्ट स्टोन क्लायडिंग’चा वापर करून अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा प्रणाली बसवण्यात येणार आहे. अंतर्गत सुशोभीकरण व विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
खेळती हवा, प्रकाश व्यवस्था, सुसज्ज उद्बोधन व ध्वनिप्रक्षेपक यंत्रणा, पूजा-विधीसाठी व भाविकांना क्षणभर श्री भगवती मंदिर सभामंडपात बसता यावे, यासाठी बैठक व्यवस्था, वृद्ध व दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था, स्तनपानासाठी हिरकणी कक्ष, शुद्ध पिण्याचे पाणी अशी व्यवस्था केली जाणार आहे.
मंदिर विश्वस्त मंडळाने भाविकांच्या सुरक्षितेसाठी वर्षभरासाठी सहा कोटींच्या विम्याची व्यवस्था केली आहे. एवढेच नव्हे, तर गडावर पंधराव्या वित्त आयोगातून ५५ लाख रुपये प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी प्राप्त झाले आहेत.
पर्यटन विभागाच्या माध्यमातून शिवालय तलावाजवळ उद्यान निर्माण करण्यासाठी दोन कोटी ८० लाख रुपये व भाविक निवारा शेडसाठी तीन कोटी २२ लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. त्यात भाविकांना स्वच्छतागृह, स्नानगृह, पिण्याचे पाणी आदींची सुविधा असेल.
गडावरील लोकसंख्या साडेतीन हजारांपर्यंत असून, दिवसाला १५ ते १८ हजार भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असते. त्यावर उपाय म्हणून विश्वस्त मंडळ आणि ग्रामपंचायतीतर्फे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.
त्यावर उपाय म्हणून गडावर पिण्याच्या पाण्यासाठी नडगीचा नाला येथे दोन कोटी ९० लाखांचे तलावाचे काम आणि पाच लाख लिटर क्षमतेच्या टाकीचे काम प्रस्तावित आहे. तसेच गडावरील १०८ कुंडांपैकी अस्तित्वातील कुंडांचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे.
गडावर येण्या-जाणाऱ्या वाहनांसाठी एक मार्ग असल्याने चंडिकापूरमार्गे नवीन पर्यायी मार्गासाठी पालकमंत्री दादा भुसे प्रयत्नशील आहेत. विश्वस्त मंडळातर्फे येथे आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र प्रशिक्षित २० जणांचे पथक कार्यरत आहे.
भाविकाची व न्यासाच्या मालमत्तेच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातंर्गत ४० जवान, ट्रस्टचे ३२ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. विश्वस्त मंडळाच्या प्रसादालयास भोग प्रमाणपत्र मिळाले असून, नाममात्र देणगीतून वीस रुपये, अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी ६० रुपयांत महाप्रसाद दिला जातो. दहा रुपयांत प्रसाद लाडू देण्याची व्यवस्था आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
गडावरील प्राचीन शिवालय तलावाचा जीर्णोद्धार करून भाविकांना स्वच्छ पाणी मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या तलावाचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
देवतांनी भगवतीची केलेली स्तुती
चित्ते कृपा समनिष्ठुरताच दृष्टा
त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेपि
शुलेन पाहि ना देवि, पाहि खड्गेनच अंबिके
घंटास्वनेन ना पाहि चापज्या नि:स्वनेनच
युद्धात पराजित होणाऱ्या शत्रूविषयी तुझी चांगली बुद्धी असते. चित्तात कृपा व समरांगणात निष्ठुरता हे दोन्ही गुण. हे देवी शूल, तलवार घेऊन रक्षण कर. घंटानादाने व धनुष्याच्या टणत्काराने आमचे रक्षण कर.
हे चंडिके तुझ्या हातातील भाल्याने चहूबाजूने आमचे रक्षण कर. हे अंबिके, तलवार, शूल, गदा आदी जी शस्त्र तुझ्या हातात असतील, त्यांच्या मदतीने आमचे रक्षण कर, ही देवतांनी भगवतीची केलेली स्तुती आहे.