Antarnad Program : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने नटला गोदाघाट! | Hindustani classical music performed in Antarnad Program at Godaghat nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students performing in the ongoing 'Antarnad' at Gangaghat.

Antarnad Program : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने नटला गोदाघाट!

नाशिक : नाशिक महापालिका व नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दुसऱ्या दिवशी तबला, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, बासरी, कथ्थक, भरतनाट्यम व ड्रमने गोदाघाट संगीताच्या स्वरांनी फुलला होता.

निमित्त होते भव्य दिव्य अशा ‘अंतर्नाद’, गायन-वादन- नृत्याचा अनोखा आविष्कार या कार्यक्रमाचे. (Hindustani classical music performed in Antarnaad Program at Godaghat nashik news)

शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्यक्षेत्रातील १५०० कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगणा आणि गुरु डॉ. सुचिता भिडे - चापेकर उपस्थित होत्या.

कस्तुरी तिलकम ही कृष्णवंदना सादर केली, सहभागी विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना ही गायन, बासरी, कथ्थक व भरतनाट्यम भावमुद्रेतून प्रस्तुत करण्यात आली. कार्यक्रमात पुढे राग दुर्गा सादर झाला, कथ्थकच्या मुलींनी जय जगदीश्वरी माता सरस्वती हि नांदी प्रस्तुत केली.

महागपतीम मनसा स्मरामी यावर भरतनाट्यमच्या मुलींनी सादरीकरण केले. पुढे यमन राग बासरी व तबल्याद्वारे सादर करण्यात आला. त्यानंतर राग तिलक कामोद - आलाप बंदिश, छोटा ख्याल - ताल त्रिताल हा प्रस्तुत करण्यात आला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

कार्यक्रमात मालकंस राग आलाप व तानासहित मुलांनी सादर केला, देस राग, तराना - बंदिश गायन प्रस्तुत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पुढे कथ्थक तबला जुगलबंदी सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दीपक भगत, महेश महांकाळे यांनी या कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.

आज महारांगोळीचे आयोजन

पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयाला अनुसरून पंचवीस हजार स्क्वेअर ‘महारांगोळी’चे आयोजन सोमवारी (ता.२०) सकाळी सहापासून करण्यात आले आहे. यासाठी शहराच्या विविध भागातून पाचशेपेक्षा जास्त महिला एकत्र येऊन सुमारे २५ हजार चौरस फूट रांगोळी साकारणार आहेत.

यासाठी त्याचे रांगोळीचे कौशल्य विकास प्रशिक्षण राबविले जाते. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.