अफाट दरवाढीने बिघडले रुग्‍णालयांचे आर्थिक स्‍वास्‍थ्य!

hospital
hospitalSYSTEM

नाशिक : कधी टीकात्‍मक, कधी विनोदातून इंधनदरवाढीची सर्वत्र चर्चा होत आहे. पण कोरोना महामारीत वैद्यकीय क्षेत्राशी निगडित वस्‍तूंच्‍या दरातील वाढीची फारशी चर्चा सर्वसामान्‍य, प्रशासन, नेतेमंडळींकडून होत नाही. वस्‍तुस्‍थितीचा आढावा घेतल्‍यास विविध वस्‍तू, साधने, उपकरणांच्‍या किमती दुप्पट ते तिपटीपर्यंत वाढलेल्‍या आहेत. जादा पैसे देऊनही उपलब्‍धतेसाठी मारामार निराळीच. रुग्‍ण बरे करताना आर्थिक ताळमेळ जुळवत तारेवरची कसरत करणाऱ्या रुग्‍णालयांचे आर्थिक स्‍वास्‍थ्य बिघडले असून, ही बाब समजून घेणे गरजेचे आहे. (Hospitals-finances-disturbed-due-to-price-hike-nashik-marathi-news)

ऐका हॉस्‍पिटल अन्‌ डॉक्‍टरांच्‍या हाका...

कोरोना महामारीच्‍या काळात सरकारी आरोग्‍य यंत्रणा किती कमकुवत आहे, हे सर्वांच्‍याच लक्षात आले. सुमारे ८५ टक्‍के बाधितांवर खासगी रुग्‍णालयांतून यशस्‍वी उपचार झाले. पण कधी दरनिश्‍चिती, तर कधी लेखापरीक्षण, अहवाल-खुलासे अशा दुष्टचक्रात खासगी रुग्‍णालयांना गोवण्याचा प्रयत्‍न झाला. सामाजिक, राजकीय, प्रशासकीय दबावाखाली काम करताना रुग्‍णालयांची बाजू समजून घेण्याचा ‘सकाळ’ने प्रयत्‍न केला. या संदर्भात धक्‍कादायक माहिती लक्षात आली आहे. कोरोना महामारीच्‍या काळात विविध वस्‍तू, साधनांच्‍या किमतीत तब्‍बल दुप्पट, तिपटीने वाढ झालेली आहे. यामुळे शासकीय दरांमध्ये उपचार करताना रुग्‍णालयांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागल्‍याचे काही उदाहरणांतून स्‍पष्ट होते. असे असतानाही तुरळक घटनांच्‍या आधारे खासगी रुग्‍णालये, डॉक्‍टरांना संशयित आरोपीच्‍या पिंजऱ्यात ठेवले गेल्‍याची दुर्दैवी बाब आहे. प्रत्‍येक क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रातही काही अपवादात्‍मक प्रकरणांमध्ये रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची लूट झाल्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही; परंतु यामुळे सर्वच क्षेत्रांनाही दोषी ठरविणे उचित ठरणार नाही.

ऑक्सिजनच्‍या किमतीपेक्षा वाहतुकीचा खर्च अधिक कसा?

दुसऱ्या लाटेत ऑक्‍सिजनचा तुटवडा केवळ रुग्‍णांसाठी नव्‍हे तर डॉक्‍टरांसाठी जीवघेणा ठरत होता. प्राणवायूसाठी डॉक्‍टरांवरच जीव जाण्याची वेळ आली होती. आश्‍चर्याची बाब म्‍हणजे कायद्यानुसार ऑक्‍सिजनचे दर मर्यादित स्‍वरूपातच आकारणे बंधनकारक असताना वाहतूक खर्चाच्‍या माध्यमातून जादाचे पैसे आकारले गेले. चक्‍क ऑक्‍सिजनच्‍या किमतीपेक्षा वाहतुकीचा खर्च अधिक असल्‍याचे तपासणीत आढळले आहे. रुग्‍णालयाकडून प्राप्त बिलानुसार ८३ हजार रुपये किमतीचे ऑक्‍सिजन रुग्‍णालयास पुरवठा करण्याकरिता वाहतूक खर्च तब्‍बल एक लाख ८० हजारांहून अधिक आकारला. आणखी एका प्रकारात तर ५४ हजारांच्‍या ऑक्‍सिजनच्‍या पुरवठ्यासाठी सव्वा लाख ट्रान्स्पोर्टेशनच्‍या नावाने आकारले गेले आहेत.

हातमोजे, मास्‍कच्‍या दरांमध्ये उसळी

एरवी रुग्‍णालयांना लागणारे मास्‍क (डिस्‍पोझेबल) एक-दोन रुपये नग या दराने मिळायचे. गेल्‍या वर्षी मार्चअखेरीस लॉकडाउन लागताच प्रतिनग किंमत दहा-पंधरा रुपयांपर्यंत पोचली. जुलैमध्ये काही प्रमाणात किमती घटल्‍या तरी पाच-सहा रुपये दराने मास्‍क खरेदी करावी लागत होती. सध्या दोन रुपये दराने मास्‍क उपलब्‍ध आहेत. ग्‍लोव्ह‍ज (पावडर) १६० रुपये बॉक्‍स (शंभर जोड) असे मिळत होते. लॉकडाउनमध्ये साडेतीनशे रुपये, तर जुलैपासून आजपर्यंत पाचशे रुपयांना बॉक्‍सची विक्री होते आहे. नायट्रेल ग्‍लोव्‍हज २२० रुपयांना बॉक्‍स मिळायचा. गेल्या वर्षी मेमध्ये साडेतीनशे, जुलैत साडेपाचशे, या वर्षी जानेवारीत सहाशे, तर नुकताच साडेआठशे रुपयांपर्यंत दर पोचल्‍याने रुग्‍णालयांकडून मर्यादित स्‍वरूपात खरेदी केली जाते आहे.

hospital
माझी शूटिंग काढा’ अन् क्षणातच पुलावरून तरुणाची नदीत उडी

हेही विसरायला नको...

-ऑक्‍सिजन उपलब्‍धतेसाठी रात्री-पहाटे डॉक्‍टरांना जावे लागले उत्‍पादकांच्‍या दारात.

-अडीच-तीन हजारांच्‍या ऑक्‍सिजन टँकसाठी मोजले अठरा-वीस हजार.

-रेमडेसिव्‍हिर उपलब्‍धतेबाबत डॉक्‍टरांवर होता प्रचंड दबाव.

-जादा पैसे मोजूनही वस्‍तू, साधनांची उपलब्‍धता नव्‍हती.

-व्‍हेंटिलेटरच्‍या दरामध्ये दुपटीपर्यंत झाली होती वाढ.

-आयसीयू केअर युनिटमधील अन्‍य वस्‍तूंकरिता मोजावे लागले जादाचे पैसे.

-पीपीईटी किटच्‍या दरांमध्येही वाढ, पहिल्‍या लाटेत उपलब्‍धतेची समस्‍या झाली होती गंभीर.

hospital
ऑनलाइन वर्ग घ्यावे की कोविडचे काम करावे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com