
Nashik Crime News : पीकअपमधून मद्याची अवैध वाहतूक लाखाचा मद्यसाठा जप्त
नाशिक : अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना दिंडोरी रोडवर महिंद्रा पीकअप जप्त करण्यात आला असून, यात सुमारे एक लाखांचा मद्यसाठा पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.
सदरची कारवाई शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने केली आहे. (Illegal transportation of liquor from pickups Liquor stock worth lakhs seized Nashik Crime News)
अंमली पदार्थविरोधी पथकाचे अंमलदार अविनाश फुलपगारे यांच्या फिर्यादीनुसार, दिंडोरी रोडने वाहनातून अवैधरित्या मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची खबर मिळाली असता, शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप ते तारवाला नगर सिग्नल या दरम्यान सापळा लावला होता.
बुधवारी (ता.२२) सायंकाळी सहाच्या सुमारास महिंद्र पीकअप वाहन (एमएच १५ जीव्ही ०६२५) आले असता, दबा धरून असलेल्या पथकाने ते रोखले. संशयित चालक अमित रमेश जाधव (२३, रा. रविराज सोसायटी, कमलनगर, हिरावाडी, पंचवटी), प्रीतम चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत पीकअपची झडती घेतली असता, त्यामध्ये अवैधरित्या मद्याचा साठा होता.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
पोलिसांनी कारवाई करीत ५ लाखांचा पीकअप आणि एक लाख ९ हजार १३५ रुपयांचा मद्यसाठा असा ६ लाख ९ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मद्यसाठा
प्रिन्स संत्रा, किंगफिशर बिअर, वडवायजर बिअर, कार्लस्वर्ग एलिफंड स्मॅगबिअर, ट्युबगर्स बिअर, किंगफिशर स्ट्राँगबिअर, गोवा जीन क्वॉर्टर, विल्यम लार्सेस व्हिस्की, ॲन्टीकुटी बॉटल असा मद्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे.