Nashik News : टरबुजाला ऐन उन्हाळ्यात कवडीमोल भाव; शेतकरी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Madhukar Ahire displaying good quality manufactured goods

Nashik News : टरबुजाला ऐन उन्हाळ्यात कवडीमोल भाव; शेतकरी त्रस्त

नरकोळ (जि. नाशिक) : रमजान पर्व व उन्हाळा लक्षात घेऊन कसमादेतील बहुतांशी शेतकऱ्यांनी या वर्षी टरबूज (Watermelon) लागवड केली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून बदलेले हवामान व एकाच वेळी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आल्याने मार्चमध्येच टरबुजाला कवडीमोल भाव मिळत आहे. (in summer Watermelon get lowest price nashik news)

सध्या मिळत असलेल्या भावामुळे उत्पादनखर्चही निघत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही शेतकरी शहरी व ग्रामीण भागात ट्रॅक्टर, टेम्पोतून स्वतः टरबुजांची विक्री करीत आहेत. कसमादेतील महामार्गासह मुख्य रस्त्यांवर टरबूज विक्रीची वाहने दिसत आहेत. मार्चमध्येच भाव कोसळल्याने आगामी एप्रिल-मे महिन्यात फळाला भाव मिळेल की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत.

केरसाणे (ता. बागलाण) येथील बहुतांश शेतकऱ्यांनी सिंबा जातीच्या टरबुजाची लागवड केली आहे. उन्हाळ्यात भाव मिळेल, या अपेक्षेने पिकाची निगा राखली. सध्या मिळत असलेल्या भाव हा कवडीमोल असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी अधिक कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

येथील शेतकरी मधुकर अहिरे यांनी सव्वा एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली. ९० दिवसांत येणारे हे पीक उन्हाळ्यात येईल आणि दोन पैसे पदरी पडतील, यानुसार लागवड केली. शेत तयार करणे, सरीवर मल्चिंग पेपर, इनलाइनचा खर्च करून लागवड केली. यासाठी त्यांना ६५ हजार रुपये खर्च आला. तर उत्पन्न केवळ ४८ हजार रुपये आले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

पदरी काही न पडल्याने मधुकर अहिरे हे निराश झाले. उन्हाळा आणि रमजान पर्व असूनही भाव मिळत नाही. व्यापारी शेतात येऊन पाच ते सात रुपये दराने खरेदी करतात. उच्च प्रतीचा माल सात ते नऊ रुपये दरम्यान विकला जात आहे. त्यामुळे केलेला खर्च निघत नाही. आता कोणते पीक करावे, या विवंचनेत शेतकरी आहेत.

एक ते सव्वा एकरासाठी झालेला खर्च

मल्चिंग पेपर - पाच हजार रुपये
सहा हजार तयार रोप - १६ हजार रुपये
लागवडखर्च - दोन हजार रुपये
रासायनिक खते - चार हजार रुपये
शेणखत - एक हजार रुपये
लिक्विड - २० हजार रुपये
इनलाइन खर्च - आठ हजार
एकूण खर्च - ६५ हजार रुपये

सव्वा एकरात उत्पन्न

पाच टन - साडेआठ रुपये किलोप्रमाणे - ४२ हजार ५००
रिटन माल - पाच हजार ५००
एकूण ४८ हजार रुपये मिळाले
१७ हजार रुपये जादा खर्च (शेतकऱ्याच्या कष्टाचा हिशेब नाही)

"गत वर्षीपेक्षा यंदा कांदालागवड भरपूर आहे. त्यामुळे टरबूज लागवड केली. भाव नसल्यामुळे केलेला खर्चही निघाला नाही. पिकासाठी घेतलेले कर्ज देखील फिटले नाही. कोणत्याच पिकाला भाव नसल्याने शेती कशी करावी, असा प्रश्‍न आहे."
- मधुकर अहिरे, टरबूज उत्पादक, केरसाणे