MPSC Exam : पुन्‍हा द्यावी लागणार टंकलेखनाची चाचणी; वेळापत्रकाची अद्याप प्रतीक्षा | It has been decided to conduct the Typing Skill Test again by MPSC nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

MPSC Exam : पुन्‍हा द्यावी लागणार टंकलेखनाची चाचणी; वेळापत्रकाची अद्याप प्रतीक्षा

Nashik News : महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२१ अंतर्गत लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गासाठी आवश्‍यक टंकलेखन कौशल्‍य चाचणी पुन्‍हा घेतली जाणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सूचनापत्रक जारी केले आहे. चाचणीसाठी सुधारित वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. (It has been decided to conduct the Typing Skill Test again by MPSC nashik news)

‘एमपीएससी’ तर्फे चाचणी परीक्षा पुन्‍हा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्‍यानुसार महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२१ अंतर्गत लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गासाठी टंकलेखन कौशल्‍य चाचणी पुन्‍हा घेतली जाणार आहे. यापूर्वी नुकताच ७ एप्रिलला मुंबई येथील केंद्रावर ही चाचणी घेतली होती.

या दरम्‍यान काही उमेदवारांना तांत्रिक अडचणी उद्‍भवल्‍या होत्‍या. अशा उमेदवारांनी आयोगाला कळविले होते. प्राप्त तक्रारींच्‍या आधारे ही टंकलेखन कौशल्‍य चाचणी पुन्‍हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलमध्ये झालेल्‍या टंकलेखन कौशल्‍य चाचणीला उपस्‍थित सर्व उमेदवारांची चाचणी पुन्‍हा घेतली जाणार आहे.

यापूर्वी जारी केलेल्‍या मानांकनांनुसारच ही चाचणी घेतली जाईल. ही चाचणी देणे पात्र उमेदवारांना बंधनकारक राहणार असून, चाचणीस गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांचा अथवा चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांचा निवडप्रक्रियेसाठी विचार केला जाणार नसल्‍याचे आयोगातर्फे स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही चाचणी केवळ मुंबई येथे आयोजित केली जाणार असल्‍याचे कळविले आहे. त्‍यामुळे उमेदवारांना पुन्‍हा एकदा मुंबई गाठावी लागणार आहे. चाचणीची दिनांक व वेळ स्‍वतंत्रपणे कळविला जाणार आहे.

त्‍या उमेदवारांमध्ये नाराजी

यापूर्वी एप्रिलमध्ये झालेल्‍या टंकलेखन चाचणीचा अनेक उमेदवारांनी कसून सराव केला होता. वेळेत चाचणी पूर्ण करताना चांगली कामगिरी नोंदविली असल्‍याने चांगल्‍या निकालाची अपेक्षा लागून होती. आधीच २०२१ च्‍या परीक्षेला विलंब झालेला असताना, चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्‍याने त्‍यांना निकालाची प्रतीक्षा लागून होती. अशात पुन्‍हा चाचणी द्यावी लागणार असल्‍याने व यामुळे अंतिम निकालास आणखी विलंब होणार असल्‍याने काही उमेदवारांकडून नाराजी व्‍यक्‍त केली जाते आहे.

टॅग्स :NashikMPSC Exam