Kasaba Bypoll Election : गिरीश महाजनांच्या कार्यक्षमतेची नाशिकमध्ये कसोटी; भाजप, शिंदे गट बॅकफूटवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Mahajan

Kasaba Bypoll Election : गिरीश महाजनांच्या कार्यक्षमतेची नाशिकमध्ये कसोटी; भाजप, शिंदे गट बॅकफूटवर

नाशिक : राज्यात घडलेले सत्तांतर, शिंदे गटाला शिवसेनेच्या नावासह मिळालेले चिन्ह या कारणांमुळे फॉर्मात आलेल्या भाजप (Bjp) व शिवसेनेच्या शिंदे (Shinde) गटासाठी नाशिकमध्ये कसबा पोटनिवडणुकीचा निकाल धक्का देणारा ठरला आहे. (kasaba bypoll election bjp shinde group on backfoot Girish Mahajan efficiency will tested in Nashik news)

निवडणुका घेण्यात जोखीम असल्याचा संदेश जाण्याबरोबरच भाजपसाठी संकटमोचक म्हणून टाळ्या मिळविणाऱ्या नाशिकमध्ये भाजपला निवडून आणण्याची जबाबदारी असलेले गिरीश महाजन यांच्यासाठीदेखील धक्का मानला जात आहे. निवडणुकीचे नियोजन करताना विरोधी पक्ष कमजोर नसल्याची भावना ठेवूनच तयारी करावी लागणार असल्याचे निकालानंतर बोलले जाऊ लागले आहे.

कसबा व पिंपरी- चिंचवड पोटनिवडणूक राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटासाठी महत्त्वाच्या होत्या. या दोन्ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने डझनभराहून अधिक मंत्र्यांसह केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांना मैदानात उतरविले. खासदार गिरीश बापट आजारी असताना भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करत त्यांना मतदारांपर्यंत पाठविले.

देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या मुद्द्यांवर मतदानाचे आवाहन केले. परंतु २८ वर्षे भाजपकडे असलेला हा मतदार संघ पोटनिवडणुकीत मतदारांनी काँग्रेसकडे सोपविला. राज्याच्या राजकारणासाठी दोन्ही मतदारसंघ जिंकणे भाजपसाठी महत्त्वाचे होते. त्याला कारण म्हणजे नुकताच विधान परिषदेच्या पाच जागांचा निकाल लागला.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

त्यात नागपूर व अमरावती या भाजपचे हे दोन हक्काचे मतदारसंघात मतदारांनी नाकारले. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर कसबा व पिंपरी पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडले. परंतु कसबा या पारंपरिक मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. नागपूर व कसबा या दोन बालेकिल्ल्यातील पराभवाचा परिणाम नाशिकमध्ये तत्काळ दिसून येत आहे.

विरोधी पक्षांना गृहीत धरण्याचा सुर

महापालिका निवडणुकीचे संकेत मिळू लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बहुमताने सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयटी पार्क, लॉजिस्टीक पार्क यासारखे विकासाचे मुद्दे चर्चेला आणले जात आहे.

महापालिका आयुक्तांकडून कामांना गती मिळत नसल्याचे कारण देत भाजपने पुन्हा एकदा चर्चेत येण्याचा प्रयत्न सुरू केला, तर शिवसेनेच्या शिंदे गटाने विकास कामांचे हत्यार उपसत निवडणुका जिंकण्याची रणनीती आखण्यास सुरवात केली. परंतु, पोटनिवडणुकीचा निकाल विरोधात गेल्याने मतदारांचा कौल वेगळाच असल्याचे गणित मांडत बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षांना गृहीत धरावे लागेल, असा सुर भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

तरीही पराभव हाती

गिरीश महाजन यांना भाजपचे संकटमोचक म्हटले जाते. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल वेगळा लागेल, अशी शंका असल्याने त्यासाठीच कसबा पोटनिवडणुकीसाठी महाजन यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली. महाजन यांच्या दिमतीला नाशिकसह जळगावचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते हजर राहिले.

नाशिकमधून वीसहून अधिक माजी नगरसेवक, आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यासह जवळपास पन्नासहून अधिक पदाधिकारी हजर राहीले. परंतु, तरीही पराभव हाती लागला. त्यामुळे महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाजन यांची कसोटी लागणार आहे.