सौभाग्याचं लेणंही महागलं!; राज्यातील कुंकू व्यवसाय पूर्वपदावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kunku

सौभाग्याचं लेणंही महागलं!; राज्यातील कुंकू व्यवसाय पूर्वपदावर

मालेगाव (जि. नाशिक) : इंधन दरवाढीने (Fuel Price Hike) सर्वत्र महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर उद्योग व्यवसाय पूर्वपदावर येत असले तरी सामान्यांना मात्र महागाईची झळ सोसावी लागत आहे. महागाईच्या या वनव्यात सौभाग्याचं लेणं असलेले कुंकू (Kunku) देखील १० ते १५ टक्क्यांनी महागले आहे. यात्रा- जत्रा सुरु झाल्याने व पंढरीच्या वारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कुंकू व्यवसाय पूर्वपदावर आला आहे. राज्यातील दीडशेपेक्षा अधिक लहान- मोठ्या कुंकू कारखान्यातून उत्पन्न घेतले जात आहे. दरम्यान, सर्वच प्रसाद साहित्याचे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत. (Kunku business preposition in state Nashik News)

कोरोना काळातील दोन वर्षात कुंकू व्यवसायाला अवकळा आली होती. यात्रा- जत्रा बंद असल्याने राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक कारखाने बंद पडले होते. कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर हा व्यवसाय पुन्हा बळकटी धरु लागला आहे. राज्यातील निम्म्यावर कुंकू कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. या भागातील कुंकू राज्यातील विविध भागासह देशभर विकला जातो. साधा व उत्तम प्रतिचा अशा दोन प्रकारात कुंकवाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील बहुसंख्य कारखान्यांमध्ये हळकुंडापासून कुंकू तयार केले जाते. इंधन दरवाढीमुळे साध्या कुंकूचे दर ८० रुपयांवरुन शंभर रुपयांवर, तर उत्तम प्रतीचा कुंकू १२० रुपयांवरुन १५० रुपये किलोवर गेले आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा यात्रोत्सव आषाढी एकादशीला पंढरपुरात भरतो. दोन वर्षानंतर वारी व यात्रा होणार आहे. राज्यातील लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. पंढरीतील यात्रोत्सव व सध्या राज्यभरातील देवस्थानांमध्ये होत असलेली तोबा गर्दी पाहता कुंकवासह प्रसाद साहित्याला मोठी मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर कुंकू कारखान्यातील उत्पादनाची लगीनघाई सुरु आहे. नारळासह इतर प्रसाद साहित्यांचे दरही वाढले आहेत. व्यावसायिक व भाविकांच्या खिशाला कात्री लागत आहे. दोन वर्षाच्या कालखंडानंतर देवस्थानांमध्ये तोबा गर्दी होत असून, प्रसाद साहित्य, हॉटेल, उपहारगृह, लॉजिंग, खासगी वाहनचालक आदींना दिलासा मिळाला आहे.

प्रसाद साहित्याचे वाढलेले दर

साहित्य पूर्वी आता

नारळ पोते - १०२० ११२०

फुलहार ३०० ५००

साखर फुटाणे ४५ ५०

रेवडी ९० ९५

खडी साखर ६५ ७०

साडी चोळी १८० २००

पेढे १०० १२०

बुक्का ४५ ४५

गंधगोळी १० १०

"कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने हळकुंडापासून कुंकू तयार होतो. इंधन दरवाढीमुळे हळकुंडाचे दर जवळपास १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. कच्चा माल कारखान्यात आणणे व पक्का माल बाजारात नेण्यासाठीचा वाहतूक खर्चही खूपच वाढला आहे. त्यामुळे कुंकवाचे दर वाढले आहे. दोन वर्षानंतर पंढरपुरात आषाढीचा यात्रोत्सव होणार असल्याने व्यवसाय पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे."

- वसीम काझी, संचालक, श्री पांडुरंग कुंकू, बुक्का उत्पादक वर्क्स, पंढरपूर

"इंधन दरवाढीमुळे पुजेचे सर्वच साहित्य महागले आहे. १० ते १५ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. सप्तशृंगीच्या चैत्रोत्सवापासून व्यवसाय पुर्वपदावर येवू लागले आहे. उन्हाळ्यातील सुट्टींमुळे भाविकांची गडावर गर्दी होत आहे. दरवाढीचा फटका व्यावसायिकांसह भाविकांनाही बसत आहे. बुक्का, गंधगोळी आदी काही वस्तुंचे भाव मात्र स्थिर आहेत."

- राहुल बेनके, संचालक, भगवती प्रसाद सेंटर, सप्तशृंगगड

टॅग्स :NashikBusiness