
Nashik News : कुऱ्हेगाव रस्ता चोरीची तक्रार खोटी; सरपंचासह पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची तयारी
नाशिक : कुऱ्हेगाव (ता. इगतपुरी) येथील सरपंचांनी त्यांच्या गावातील रस्ता चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी केली. या चौकशीत तथ्य नसल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे या खोट्या तक्रारीची मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गंभीर दाखल घेतली असून तक्रारदार सरपंच विरोधात कारवाई करण्याची तयारी केली आहे. या कारवाईच्या बडग्यामुळे जिल्हा परिषदेत अशा खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Kurhegaon road theft complaint false Preparation of action against office bearers including Sarpanch Nashik News)
गेल्या महिन्यात मालेगाव तालुक्यातील टोकडे येथे रस्त्याची चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास पूर्ण करून अहवाल प्राप्त झाला. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून आले होते.
त्यानंतर लगेचच इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील सरपंचांनीच रस्ता चोरीस गेल्याची तक्रार झाली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी याबाबत पथक नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी पेठ उपअभियंता, शाखा अभियंता आणि विभागातील अधिकारी यांचे पथक नेमले. पथकाने जागेवर तक्रारदारांना समोर ठेवून पाहणी केली. या पाहणीमध्ये तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पथकाने रस्ता खोदून तपासणी केली.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
त्यात रस्त्याची लांबी, रुंदी व खोली तपासली असता काम १०० टक्के झाले असल्याचे निदर्शनास आले. त्याचे छायाचित्र देखिल काढले. शिवाय तक्रारदार सरपंच यांना रस्ता दाखवत त्यांच्या तक्रारीचे निरसन केले.
उपसरपंचांनी रस्ता झाला असल्याचे लेखी दिले. त्यानंतर कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी रस्ता चोरीला गेला नसल्याचा अहवाल सादर केला. प्राप्त झालेल्या अहवालानुसार, जिल्हा परिषदेची बदनामी करण्याच्या हेतूने कुऱ्हेगावच्या सरपंच संगीता धोंगडे व पदाधिकारी भाऊसाहेब धोंगडे यांनी तक्रार केली असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.