लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करणार; भुजबळांच्या तारांकितवर मंत्री चव्हाणांचे उत्तर : Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stalled flyover work of external detour.

Nashik News: लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करणार; भुजबळांच्या तारांकितवर मंत्री चव्हाणांचे उत्तर

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. याठिकाणी उड्डाणपुलाचे काम देखील पूर्ण झाले आहे. मात्र केवळ भूसंपादनास निधी नसल्याने हे काम रखडले आहे.

त्यामुळे लासलगाव बाह्य वळण रस्ता आणि रेल्वे उड्डाणपूल भूसंपादनासाठी प्राधान्याने निधीची तरतूद करण्यात येऊन काम पूर्ण करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात केली.

यावर उत्तर देताना लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी निधी तरतूद करून रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. (Lasalgaon to complete outer ring road work soon Minister Chavans reply on Bhujbals question Nashik News)

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

तारांकित प्रश्न उपस्थित करताना छगन भुजबळ म्हणाले, लासलगाव बाह्य वळण रस्ता आणि रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलासाठी आवश्यक जमिनीचे थेट खरेदी करून भूसंपादन करण्याकरिता येथील शेतकऱ्यांनी आवश्यक संमतिपत्र दिलेले आहे.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने थेट खरेदीसाठी दर सुद्धा निश्चित करून दिलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ खरेदीखते नोंदवून शेतकऱ्यांना मोबदला अदा करून थेट खरेदीची कार्यवाही करणे आवश्यक आहे.

या भूसंपादनासाठी रक्कम ३१ कोटी ५० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी निधीची तरतूद करण्यात यावी व रखडलेले काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली.