
Latest Marathi News : RTE प्रवेश अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस
Nashik News : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शनिवारी (ता.२५) शेवटचा दिवस आहे. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी पालकांना त्यांच्या पाल्यांची ऑनलाइन माहिती भरायची आहे.
यापूर्वी ऑनलाइन अर्ज भरण्याची १७ मार्च मुदत होती. मात्र त्यात मुदतवाढ देण्यात आली असून शहरातील ८९ शाळांमध्ये मुलांना प्रवेश दिले जाणार आहेत.
आरटीईच्या ऑनलाइन प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरताना अनेकदा सर्व्हर जाम, संकेतस्थळ उघडत नाही. अशा तांत्रिक अडचणींचा पालकांना सामना करावा लागत असल्याने मुदतवाढ देण्यात आली. नाशिक हद्दीत एका केंद्रात ५१ तर दुसऱ्या केंद्रात ३८ शाळा आहेत. यापैकी दोन शाळांमध्ये नर्सरीसाठी एन्ट्री लेव्हल आहे.
आरटीई प्रवेश होऊ शकतील नाशिक महापालिकेच्या हद्दीत अशा एकूण ८९ शाळा आहे. त्यामध्ये १ हजार ७७९ जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही प्रवेशासाठी राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर होईल.
तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागा एवढी एक प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. प्रवेशासाठी एक नियमित फेरी राबविली जाईल.
नियमित फेरीनंतर जागा रिक्त राहिल्यास टप्प्याटप्प्याने प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश होतील. पालकाने एकाच पाल्याचे एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. अर्ज सादर करताना जमा करावयाच्या कागदपत्रांची माहिती पालकांनी योग्य पद्धतीने जाणून घेणे गरजेचे आहे.
संकेतस्थळावर या बाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. एका शाळेत प्रवेशानंतर पालकाने दुसऱ्या शाळेत प्रवेशाचा निर्णय घेतल्यास, संबंधित पाल्याला दुसऱ्या शाळेत आरटीईद्वारे प्रवेश मिळू शकणार नाही. म्हणून एकदा झालेला प्रवेश त्याच शाळेत असेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.