Nashik News: संसद ग्रामचा प्रस्ताव तयार करण्यास हलगर्जीपणा; खासदार गोडसेंचे ZP प्रशासनाला निर्देश | Laxity in preparation of Sansad Gram proposal MP Godse instructions to ZP administration Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

meeting

Nashik News: संसद ग्रामचा प्रस्ताव तयार करण्यास हलगर्जीपणा; खासदार गोडसेंचे ZP प्रशासनाला निर्देश

Nashik News : सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड झालेल्या सिन्नर तालुक्यातील किर्तांगळी गावामध्ये विकासकामे करण्यासाठी प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचे उघड झाले.

आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवडलेल्या किर्तांगळी येथील रस्त्याच्या कामांच्या निगडित पीडब्ल्यूडी, जिल्हा परिषद प्रशासनाकडून तीन महिन्यात प्रस्तावच तयार झालेला नसल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी निष्काळजीपणा करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी बैठकीत केली. (Laxity in preparation of Sansad Gram proposal MP Godse instructions to ZP administration Nashik News)

सांसद आदर्श ग्राम योजनेत समावेश असलेल्या किर्तागळी गावात नेमके किती विकास कामे झाले याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. आणि खासदार गोडसे यांच्या उपस्थितीत आज (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी जोशी, सरपंच कुसुमताई चव्हाणके यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

बैठकीत आराखड्यात मंजूर असलेल्या विविध विकास कामांचा प्रस्ताव तयार करण्यास अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे दिसल्याने खासदार गोडसे संतापले. किर्तांगळी गावात एकूण ३२ विकास कामे होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

पैकी अवघी ७ कामे पूर्ण झाली ३ प्रगतिपथावर आहे. उर्वरित २२ कामांचे साधे प्रस्तावही तयार झालेले नसल्याचे आढावा बैठकीत समोर आल्याने खासदार गोडसे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

किर्तांगळी गावाचा विकास करण्यासाठी तयार करण्यात आराखड्यातील कामांचे साधे प्रस्तावही विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी अद्यापपावेतो तयार केलेला नाही. विकास कामांचे प्रस्ताव तयार करणे हे शासकीय काम असून अधिकाऱ्यांना शासकीय जबाबदारीचं भानच दिसत नाही, अशा शब्दात सुनावले.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सहा कामे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले.

जिल्हा परिषदेकडे असलेले अकरा आणि सार्वजनिक पीडब्ल्यूडीचे सहा असे एकूण सतरा कामांच्या प्रशासकीय मान्यतेसह प्रस्ताव तयार करून आठवडाभरात सादर करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Nashikhemant godse