नाशिककरांना कमी दाबाने, कमी वेळ पाणीपुरवठा

तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठ्यास अडचण
Water-Supply
Water-SupplySakal

नाशिक - नाशिककरांच्या नळाचे पाणी एप्रिलमध्येच आटले आहे. कुठे कमी दाबाने, तर कुठे कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींना शहरवासीयांमधून तोंड फुटले आहे. तांत्रिक कारणामुळे गरजेपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याचे कारण महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पुढे करण्यात आले आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून शहरवासीयांना दैनंदिन वापरासाठीच्‍या पाण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. उंटवाडी परिसर, सिडको, सातपूर, इंदिरानगर, नाशिक रोड, पंचवटी, गंगापूर रोड अशा परिसरातील अनेक भागांसह पंचवटीच्या काही भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी धो-धो, तर काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात पन्नास टक्क्यांहून अधिक पाणी आहे, मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर ज्या २३ खेड्यांचा महापालिकेत समावेश केला, त्यात लोकसंख्येच्या दृष्टीने आडगाव हे सर्वात मोठे गाव आहे. मात्र, काही भागातील पाण्याची समस्या कठीण झाली आहे.

शहराचे विस्‍तारीकरण होत असताना जुन्‍या इमारती, बंगल्‍यांच्‍या जागी मोठ्या इमारतींचे बांधकाम केले जात असले तरी पाणी पुरवठ्यासाठी जुनीच अर्धा इंची जलवाहिनीचा आधार घेतला जात असल्‍याने ही गैरसोय होत असल्‍याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे. यासंदर्भात खातरजमा करत गरजेनुसार जलवाहिनीत दुरुस्‍ती करण्याचा सल्‍ला दिला जातो आहे. शहराला साडेपाचशे ते सहाशे दशलक्ष लिटर पाणी महापालिका रोज पुरवते. उन्‍हाळ्यात पाण्याचा वापर वाढला आहे. यापूर्वीची स्थिती पाहिल्‍यास धरण साठा खालावल्‍यास मेमध्ये नाशिककरांना पाणी कपातीच्‍या संकटाला सामोरे जावे लागते. मात्र, सध्या छुप्‍या पद्धतीने पाणी कपात केली जात असल्‍याची शहरवासीयांची तक्रार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com