
Nashik News : गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडविले
नाशिक : कंपनीतील गुंतवणुकीवर भरघोस मोबदल्याचे आमिष दाखवून दांपत्यासह एकाने अनेकांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर त्र्यंबक दरगुडे, निकीता ज्ञानेश्वर दुरगुडे (दोघे रा. ब्राम्हणगाव, लासलगाव ता. निफाड) व संजय जगताप, अशी संशयिताची नावे आहे. प्रशांत जीवन गुरव (४५ रा. डीजीपीनगर- २, अंबड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयितांनी २०१६ मध्ये महात्मानगर येथील कदम मेन्शन कॉम्प्लेक्समध्ये रिअल रिचार्ज ॲन्ड मार्केटिंग नावाच्या कंपनीचे कार्यालय थाटले होते.
या वेळी गुरव व त्यांच्या नातेवाइकांनी संशयितांशी संपर्क साधला होता. संशयित दांपत्याने गुरव यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना कंपनीच्या विविध स्कीमचे आमिष दाखवून कंपनीतील गुंतवणुकीवर भरघोस मोबदला देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार गुरव व त्यांच्या नातेवाइकांनी २० जून २०१६ ते ५ मार्च २०१७ दरम्यान सुमारे ७ लाख ७४ हजाराची गुंतवणुक केली होती.
दरम्यान, गुंतवणुक केल्यानंतर गुंतवणुकीवरील मोबदल्याची मुदत संपूनही संशयितांनी गुंतवणुकीची रक्कम आणि मोबदला परत न केल्याने गुरव यांनी तगादा लावला असता संशयित त्रिकुटाने टोलवाटोलवी केली. त्यामुळे गुरव व त्यांच्या नातेवाइकांनी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.