Maha Shivratri : महाशिवरात्रीला मंदिर पहाटे 4 पासून खुले; त्र्यंबकेश्‍वराचे गर्भगृह दर्शन मात्र बंद राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trimbakeshwar Temple

Maha Shivratri : महाशिवरात्रीला मंदिर पहाटे 4 पासून खुले; त्र्यंबकेश्‍वराचे गर्भगृह दर्शन मात्र बंद राहणार

त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) : महाशिवरात्रीला शनिवारी (ता. १८) पहाटे चारपासून रात्री नऊपर्यंत येथील ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी खुले असेल. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गर्भगृह दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय श्री त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.

ट्रस्टतर्फे भाविकांना गायत्री मंदिराजवळ प्रसादाचे वाटप करण्यात येईल. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

गर्भगृह, सभामंडप, उत्तर प्रवेशद्वार आणि पूर्व महाद्वार आदी ठिकाणी फुलांची सजावट केली जाईल. (Maha Shivratri festival temple opens from 4 am sanctorum darshan of Trimbakeswara remain closed nashik news)

नवीन दर्शन मंडपातून दोन्ही बाजूंनी भाविकांची सोय करण्यात येणार आहे. तसेच भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असेल. तातडीने दर्शन घेऊन इच्छिणाऱ्या भाविकांना देणगी दर्शन संपूर्ण दिवसभर सुरू राहील.

देणगी दर्शनासाठी भाविकांकरिता सुविधांयुक्त दर्शन मंडप तयार करण्यात आला आहे. याशिवाय महाशिवरात्रीनिमित्त ट्रस्टतर्फे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी सहाला सितारवादक निलाद्री कुमार यांचा सितारवादनाचा कार्यक्रम होईल.

सायंकाळी साडेसातला ओम नटराज अकादमीतर्फे कथक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. नृत्य दिग्दर्शन मयुरी बेडककर यांचे असेल.

महाशिवरात्रीला घोषवादन

महाशिवरात्रीनिमित्त दुपारी दोनला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घोषवादन होईल. तसेच सायंकाळी साडेपाचला समूह बासरीवादनाचा, सायंकाळी साडेसातला कीर्तनकार चंद्रशेखर शुक्ल यांचा शिवस्तुतीपर कार्यक्रम होईल.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

रविवारी (ता. १९) सायंकाळी सातला पंडित जसराज यांचे शिष्य पंडित प्रसाद दुसाने यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल. हे सर्व कार्यक्रम मंदिराच्या पटांगणात होतील.

शहरात पालखी सोहळा

महाशिवरात्रीला श्री त्र्यंबकराजच्या पालखीचा सोहळा होईल. दुपारी तीनला पालखी मंदिरातून निघेल. पारंपरिक मार्गारून पालखी तीर्थराज कुशावर्तपर्यंत जाईल. इथे षोडशोपचारे पूजा होईल.

सायंकाळी पाचला पालखी पुन्हा मंदिरात येईल. सायंकाळी पाचला लघुरुद्र अभिषेक होईल. श्री त्र्यंबकराजाची विशेष महापूजा आणि पालखी सोहळा रात्री बारा ते अडीच यादरम्यान होईल.