महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचना पाहून इच्छुकांसह मातब्बरांना फुटला घाम

election
electionesakal

मालेगाव (जि. नाशिक) : महानगरपालिकेच्या (MMC) आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे (general election) नगारे वाजू लागले आहेत. शहरातील ३२ प्रभागातून ९५ नगरसेवक महापालिकेत पोहोचतील. नवीन प्रारुप प्रभाग रचना (Ward Formation structure) ८ जूनला जाहीर झाली. प्रभाग रचना पाहून निवडणुकीसाठी गेली दोन वर्षे बाशिंग बांधून बसलेल्या इच्छूकांसह मातब्बरांनाही घाम फुटला आहे. महापालिका निवडणूक विभागाच्या (Municipal Election Department) अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवत गुगुल मॅपद्वारे स्वतंत्र सुधारीत प्रभाग रचना केल्याने अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. प्रभाग रचनेत वेगवेगळ्या विभागांची जोड-तोड झाल्याने विद्यमान बहुसंख्य नगरसेवकांनाही निवडणूक अडचणीची ठरणार आहे. (Malegaon Municipal Corporation draft ward structure Nashik News)

प्रारुप प्रभाग रचनेवर २० जूनपर्यंत हरकती दाखल करता येणार असल्या तरी किती हरकती विचारात घेतल्या जातील या विषयी सांशकता आहे. त्यातच महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक मेमध्ये अपेक्षित होती. तथापि ओबीसी आरक्षणासह विविध मुद्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने तयारी करणाऱ्यांचा हिरमोड झाला. महापालिकेच्या विद्यमान पदाधिकारी व नगरसेवकांचा कार्यकाळ १३ जूनला संपणार आहे. आगामी दोन दिवस सुटी असल्याने व सोमवारपासून महापालिकेवर आयुक्त भालचंद्र गोसावी प्रशासक म्हणून कामकाज पाहणार असल्याने विद्यमान नगरसेवकांचा आजचा अखेरचा दिवस होता. प्रशासनाने वाहने जमा करण्याची कार्यवाही देखील सुरु केली होती.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या पाच लाख ९० हजार ९९८ आहे. त्यानुसार कमीत कमी १७ हजार ते जास्तीत जास्त २१ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग करण्यात आला आहे. प्रारुप प्रभाग रचना जाहीर होताच आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. प्रभागांचे प्रारुप पाहता राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला नाही. २० जूनपर्यंत हरकती दाखल करता येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर हरकती येण्याची शक्यता आहे. हरकतींवरील सुनावणीनंतर अंतिम प्रभागरचना जाहीर होईल. आरक्षणानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार असला तरी प्रारुप प्रभाग रचनेनुसार इच्छूकांनी चाचपणी व भेटीगाठी सुरु केल्या आहेत. संमिश्र वस्ती, मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी तसेच आर्थिक दुर्बल कुटुंबियांची संख्या पाहता प्रभागातील गणित जुळवितांना निवडणुकीसाठी मोठा खर्चही अपेक्षित आहे.

election
ताडपत्रीचे दर कडाडले; शेतकरी वर्ग वळला बॅनर खरेदीकडे

यापुर्वी चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने काही मोजके प्रभाग वगळता सर्वच नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख या प्रमाणे संपुर्ण प्रभागातील निवडणुकीसाठी एका पॅनलच्या चार नगरसेवकांची एक कोटी रुपये खर्च झाल्याचे सर्वश्रृत आहे. आता तीनचा प्रभाग झाल्याने प्रत्येकी ३० ते ३५ लाख रुपये निवडणुकीसाठी खर्च अपेक्षित आहे. खर्चाचा हा अंदाजे आकडा पाहून अनेकांची डोळे विस्फारली आहेत. याउलट आर्थिकदृष्ट्या मातब्बर असलेल्यांनी त्यादृष्टीने गणिते जुळविण्यास सुरवात केली आहे. राजकीय पक्षांनीही प्रत्येक प्रभागात किमान एक उमेदवार आर्थिकदृष्ट्या प्रचंड सक्षम असावा यासाठी शोध व चाचपणी सुरु केली आहे. या स्थितीमुळे ऐनवेळी अचंबित करणारी आर्थिकदृष्ट्या मातब्बर नावेही इच्छूक म्हणून समोर येण्याची शक्यता आहे.

election
Nashik : महापालिकेचा खासदार पुत्रास दणका; ठोठावला 4 लाखाचा दंड

अशी आहे रचना

नवीन प्रारुप प्रभाग रचनेत कलेक्टरपट्टा व सोयगाव नववसाहतीचा समावेश असलेल्या प्रभाग १४ मधील लोकसंख्या सर्वाधिक २० हजार ६३७ आहे. याउलट द्याने, रमजानपुरा भागातील प्रभाग क्रमांक २ हा १६ हजार ७८५ लोकसंख्येचा आहे. २० हजारहून अधिक लोकसंख्या असलेले चार प्रभाग आहेत. १९ हजार लोकसंख्या असलेले सात प्रभाग आहेत. प्रभाग ४ हा क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक १९ क्षेत्रफळाने सर्वाधिक लहान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com