
Nashik Bribe Crime : सातबारा उताऱ्यावर वडिलांच्या जागेवर आईचे नाव लावण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना सावरगाव सजाचे मंडळ अधिकारी पांडुरंग कोळी आणि खासगी व्यक्ती विठोबा जयराम शिरसाठ (ठाणगाव, ता. येवला) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. ८) पकडले.
येवला तालुका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला. कोळी यांना निवृत्तीसाठी एक वर्षाचा कालावधी असताना लाच घेताना पकडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Mandal officer arrested while taking bribe of 9 thousand in Yeola nashik bribe crime)
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार ठाणगाव येथील तक्रारदारांनी लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत वडिलांच्या सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी सावरगावचे मंडल अधिकारी पांडुरंग कोळी यांनी १५ हजारांची मागणी केली.
तडजोडीअंती नऊ हजार रुपये लाचेची रक्कम खासगी व्यक्ती विठोबा शिरसाठमार्फेत स्वीकारताना सापळा रचून पकडण्यात आले. पोलिस निरीक्षक मीरा आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण महाजन, किरण अहिरराव, प्रमोद चव्हाणके, परसराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गेल्या महिन्यात २२ तारखेला ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या सहय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे व पोलिस शिपाई सतीश बागूल यांच्याविरुद्धही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक मीरा आदमाने अधिक तपास करत आहेत.