
Marathi Rajbhasha Gaurav Din : मराठी अधिकाधिक समृद्ध होवो!
Nashik News: मराठी भाषेचा झेंडा अटकेपार पोचलेला असताना भाषा काळानुरूप अधिक समृद्ध होण्यासाठी इंग्रजी भाषेला पर्यायी मराठी शब्द तयार व्हायला हवे. त्यांचा वापरही अधिक प्रमाणात व्हावा, या उद्देशाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ‘मला शब्द द्या’ हा ललित लेख लिहिला.
यातून मराठी भाषेचा वापर वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तात्यासाहेबांची जयंती (ता. २७) मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी होत असताना इंग्रजी शब्दांना उपलब्ध झालेले पर्यायी मराठी शब्दांचा अधिकाधिक वापर व्हायला हवा, अशी भावना व्यक्त होत आहे. (Marathi Rajbhasha Gaurav Din Let Marathi prosper more and more musumagraj pratishthan nashik news)

तरण तलावाजवळील वाहतूक बेटावरील शिल्पास रविवारी केलेली रंगरंगोटी.

मांडणी केलेले साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ, पद्मभूषण व इतर पुरस्कार.
‘भाषेचा विकास हा तीन अंगांनी होतो, त्या म्हणजे व्यवहार भाषा, परिभाषा व शैलीदार भाषा. बाजारात व्यवहार भाषा फार उपयोगी ठरते. येथे स्थानिक बोलीभाषेप्रमाणे शब्द वापरले जातात. परिभाषेवर इंग्रजीचा फार पगडा असल्याचे दिसून येते.
विज्ञान शाखेत वापरात आलेल्या बहुतांश इंग्रजी शब्दांना अजूनही पर्यायी मराठी शब्द नाहीत. निर्माण झालेल्या शब्दांचा वापर वाढविल्यास विज्ञान क्षेत्रातही मराठीचा वापर निश्चितपणे वाढणे शक्य आहे. आता अकरावी, बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण मराठीतून मिळणार आहे.
विधी शाखेचे शिक्षण मराठीतून मिळते. त्यामुळे मराठीतून शिक्षणाचा मार्ग मोकळा झालेला दिसतो. त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी शैलीदारपणा विचारात घ्यायचा म्हटले तर अगदी ग्रामीण भागात मराठी म्हणींचा वापर अगदी अस्खलिखित केला जातो.
ही मराठी भाषेची शैली झाली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी मुले घरी शुद्ध मराठी बोलतात. त्यामुळे इंग्रजी भाषेचे अतिक्रमण वाढत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असेही मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.
जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा मराठी बोलली जाते. त्यामुळे ही भाषा आता जागतिक स्तरावर पोचली आहे. तिचा वापर वाढविण्यासाठी इंग्रजी भाषेला पर्याय असणारे शब्द शोधून त्यांचा वापर वाढविल्यास मराठी भाषा कालसुसंग होईल.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे रविवारी ठेवण्यात आलेल्या कुसुमाग्रजांच्या खोलीतील विविध वस्तू.
यादृष्टीने कुसुमाग्रजांनी ‘मला शब्द द्या’ या ललित लेखातून मराठी भाषेत पर्यायी शब्द तयार करण्याचे आवाहन केले होते. सद्यःस्थितीत क्षेत्रनिहाय हजारो शब्दांची भर पडली. त्यांचा वापर आपण केला तर मराठी तात्यासाहेबांना अभिप्रेत असणारी भाषा अधिक समृद्ध होईल.
ग्रंथदिंडीसह विविध कार्यक्रम
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथून सोमवारी (ता. २७) सकाळी साडेसातला ग्रंथदिंडी निघणार आहे.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे दिवसभर विविध कार्यक्रम होत आहेत. सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, खासगी संस्थांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत.
"कुठलीही भाषा आणि संस्कृती या अभिन्न आहेत. भाषेसोबत तेथील संस्कृती जोडलेली असते. त्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विज्ञान, वैद्यकीय शाखेतील शिक्षण मराठीतून मिळत आहे. इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द तयार होतील तेव्हा भाषेचा वापर अधिक वाढेल."
- डॉ. दिलीप धोंडगे, माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र