esakal | Marathi Sahitya Sammelan 2021 : तिसऱ्या लाटेची शक्यता बघता संमेलन ऑक्टोबरमध्ये होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

 marathi sahitya sammelan

Marathi Sahitya Sammelan : कोरोनामुक्त वातावरणात व्हावे संमेलन

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्चमध्ये घेण्यात येणार होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ते स्थगित करावे लागले होते. आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बघता संमेलन ऑक्टोबरमध्ये होणार की नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. तिसरी लाट येणार असेल, तर संमेलन घेणे अवघड होणार असून, कोरोनामुक्त वातावरणात संमेलन व्हावे, अशी अपेक्षा साहित्यिकांमधून व्यक्त होत आहे. (Marathi-Sahitya-Sammelan-Meetings-should-be-in-corona-free-environment)

तिसरी लाट येणार असेल, तर परिस्थिती होईल अवघड; साहित्यिकांचे मत

मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलन होण्यासंदर्भात शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यास ऑक्टोबरमध्ये संमेलन होणार असल्याच्या शक्यताही वर्तविण्यात आल्या आहेत. संमेलनाच्या नियोजनाबाबत श्री. ठाले-पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर स्वागत समिती सदस्यांकडून निमंत्रकांवर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर संमेलनाचा ‘ताळेबंद’ सादर झाल्यानंतर तापलेले वातावरण शांत झाले आहे. दरम्यान, जानेवारीत नाशिकला संमेलन घोषित झाल्यानंतर आनंदाचे वातावरण होते. आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे ऑक्टोबरमध्ये संमेलन होणार अशा चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. साहित्यिकांनीही संमेलन भयमुक्त, कोरोनामुक्त वातावरणात व्हावे, असे म्हटले आहे.

कोरोनाची परिस्थिती किती सुधारते, हे येत्या काळात पाहावे लागेल. संमेलन होण्यासाठी शासनाने परवानगी दिली, तर ते शक्य होणार असून, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असेल, तर संमेलन घेणे अवघड होईल. कोरोनाच्या परिस्थितीवर सर्व अवलंबून असून, परिस्थिती बिघडल्यास संमेलन घेण्याविषयी महामंडळ आग्रह धरणार नाही. - रावसाहेब कसबे

कोरोनाच्या वातावरणात जोखीम न घेता संमेलन पार पाडावे. संमेलनात साहित्यिकांशी चर्चा होतात. नवनवीन पुस्तके पाहता येतात. मराठी साहित्य संमेलनाचा उत्सव भव्यदिव्य स्वरूपाचा असतो. संमेलन गाठीभेटींचा उत्सव असल्याने तसेच स्वरूप यंदाच्या साहित्य संमेलनाचे असावे, तेव्हाच खरा आनंद मिळेल. -प्रा. डॉ. दिलीप धोंडगे

कोरोनामुळे वर्षभरापासून सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाइन होत आहेत. मराठी साहित्य संमेलनात हजारो साहित्यरसिक, प्रेमी येत असल्यामुळे संमेलनात उत्साह राहतो, अनेकांना प्रत्यक्ष भेटता येते. संमेलन ऑफलाइनच होऊन भयमुक्त वातावरणात कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर संमेलन व्हावे. -प्रकाश होळकर

कोविडची परिस्थिती निवळल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्सव होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे संमेलन होणे अशक्य वाटत आहे. मराठी साहित्याचा हा उत्सव ऑफलाइन होणे अपेक्षित आहे. प्रत्येकाने कोरोनाकाळात आरोग्याची खबरदारी घ्यावी. - रेखा भांडारे

हेही वाचा: पोलिसांच्या सतर्कतेमुळे थांबला अल्पवयीन मुलीचा साखरपुडा

हेही वाचा: सिडकोत मनसेला सक्षम नेतृत्वाची गरज; ‘भोपळा’ फोडण्याचे आव्हान

loading image