नाशिकच्या साहित्य संमेलनाचा मार्ग मोकळा! नाशिककर साहित्यिकांना अपेक्षा

sahitya sammelan 123.jpg
sahitya sammelan 123.jpg

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेली स्थळ निवड समितीने गुरुवारी (ता. ७) नाशिकला भेट दिली. यंदाचे संमेलन नाशिकला होणार हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे नाशिकच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, यापूर्वी ७८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जेव्हा नाशिकला झाले, तेव्हच्याच उत्साहाची यंदाही पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

साहित्यनगरी म्हणून नाशिकची ओळख 
साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणे स्वागतार्ह आहे. संमेलनाला गर्दी होईल याचा आयोजक व साहित्य महामंडळ यांनी विचार केला असेलच. नाशिक साहित्यनगरी म्हणून ओळखली जाते. पूर्वीचे साहित्य संमेलन उत्तम झाले होते. त्यामुळे आताचेही संमेलन उत्तमच होईल, असा विश्‍वास आहे. - प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे 

नाशिकला मान मिळतो, यात आनंदच 
नाशिककर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. लोकहितवादी ही जुनी संस्था असून, नाशिकला साहित्यिक परंपराही मोठी आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकला मान मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. - प्रकाश होळकर, लासलगाव 
 

नव्या पिढीला व्यासपीठ मिळणार 
श्रद्धेय कुसुमाग्रज आणि कानेटकरांसारख्या थोर साहित्यसंतांची परंपरा लाभलेल्या नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणे, ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या संमेलनामुळे नाशिकच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक जाणिवा अधिक समृद्ध होतील. नाशिकच्या उभरत्या आश्‍वासक तरुण लेखणीला ऊर्जा देणारे हे संमेलन नाशिकच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल. संमेलनातून नव्या पिढीला व्यासपीठ मिळणार आहे. बऱ्याच वर्षांनी संमेलन होत असल्याने त्याचा फायदा नक्कीच होईल. - शोभा भांडारे 

...तरी दर्दींमुळे होईल संमेलन यशस्वी 
नाशिकमध्ये यापूर्वी १९४२ व २००५ मध्ये मराठी साहित्य संमेलन झाले आहे. २००५ मध्ये झालेले ७८ वे मराठी साहित्य संमेलन तर ‘न भूतो, न भविष्यती’ असेच होते. यंदा लोकहितवादी मंडळाच्या माध्यमातून नाशिकला संधी मिळाल्यास, साहित्यविषयक उपयुक्त चर्चा होईल. ग्रंथ व एकूणच साहित्य व्यवहाराला हातभार लागेल, असा विश्‍वास वाटतो. संमेलनात गर्दी झाली नाही तरी, दर्दी मात्र आवर्जून उपस्थिती लावतील. त्यामुळे नाशिककर हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी करतील, असे वाटते. - प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे 

खबरदारी घेऊन संमेलन होणे सुखदायक ठरेल 
प्रस्तावित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान नाशिकला मिळाल्यास मार्चच्या अंतिम आठवड्यात ते होऊ शकते. त्यासाठी अद्याप जवळपास ९० दिवसांचा कालावधी आहे. आत्ताची परिस्थिती आशादायक आहे. कोरोनाची दुसरी लाट आपण थोपावली आहेच. पुढील काही दिवसांत शाळा, महाविद्यालयांप्रमाणेच अन्य क्षेत्रही पूर्वपदावर येतील. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन संमेलन होणे सुखदायक ठरेल. दहा महिन्यांपासून साहित्यिक आणि सांस्कृतीक गतविधी पूर्णत: ठप्प आहेत. संमेलनाच्या रूपाने ही मरगळ झटकता येईल. नेटफ्लिक्स, ॲमेझोनच्या दुनियेत अडकलेल्या लोकांना या निमित्ताने पुन्हा पुस्तकांच्या दुनियेत आणता येईल. - जयप्रकाश जातेगावकर 

नाशिकचे योगदान मोठे 
लोकहितवादी मंडळाने नाशिककरांतर्फे आमंत्रण दिले असले, तरी यात सर्वच नाशिककरांचा सहभाग असणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीची जागा संमेलनासाठी सुचविण्यात आलेली आहे. कविवर्य कुसुमाग्रज याच संस्थेच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी वर्षात राज्याचे सांस्कृतिक, साहित्याबाबतचे पुढारलेपण अधोरेखित झाले आहे. नाशिकला साहित्याची मोठी परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील नाशिकचे योगदानही मोठे आहे. याशिवाय, नाशिक जिल्हा म्हणून १५१ वर्ष झालेली आहेत. त्यामुळे इतिहासाशी दुवा जोडणारे, परिवर्तनासाठी आग्रही असलेले आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारे शहर, अशी नाशिकची ओळख आहे. त्यामुळे येथे साहित्य संमेलन झाल्यास आनंदच होईल. - हेमंत टकले  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com