Nashik News : निधी खर्चासाठी जिल्हा परिषदेत मॅरेथॉन बैठका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad nashik

Nashik News : निधी खर्चासाठी जिल्हा परिषदेत मॅरेथॉन बैठका

नाशिक : जिल्हा परिषदेला (Zilla Parishad) प्राप्त झालेला विकासकामांचा निधी वेळात खर्चासाठी प्रशासन सरसावले असून,

मंगळवारी (ता.१) अतिरिक्त मुख्य़कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी बांधकामाच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. (Marathon meetings in Zilla Parishad for fund expenditure Additional Chief Executive Officer warned that funds must be spent on time nashik news)

बैठकीत प्राप्त निधी, अखर्चिक निधी खर्चाचा आढावा झाला. निधी अर्खित राहता कामा नये, निधी वेळात खर्च झालाच पाहिजे अशी सक्त ताकीद यावेळी गुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिली.

जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेला निधी खर्चासाठी जिल्हा परिषदेस दोन वर्षांचा कालावधी असतो. मात्र असे असतानाही सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील तब्बल ९५ कोटी निधी अद्याप खर्च झालेला नाही. मार्च उजाडला असल्याने निधी खर्च झाला पाहिजे यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

या अनुषंगाने अति. मुख्यकार्यकारी अधिकारी गुंडे यांनी निधी खर्चाशी निगडित प्रामुख्याने बांधकाम विभागाच्या मंगळवारी दिवसभर बांधकाम एक, दोन व तीन तसेच जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता, तालुका शाखा अभियंता, उपअभियंते यांची संयुक्त बैठका घेतल्या.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

बैठकीत बांधकाम विभाग एक मधील बिगर आदिवासी भागातील ग्रामीण रस्त्यांचा ८२ टक्के तर इतर जिल्हा मार्गाचा ९९.४१ टक्के तर, आदिवासी विभागातील ग्रामीण रस्त्याचा ७५.६० टक्के व इतर जिल्हा मार्गाचा ५७.६८ टक्के निधी खर्च झाला असल्याचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी सांगितले. आदिवासी विभागातील निधी खर्च कमी असल्याने, तो तत्काळ खर्च करण्याच्या सूचना सोनवणे यांनी यावेळी दिल्या.

आदिवासी अंतर्गत कामे झालेले असून बिले सादर करण्याचे कामे सुरू आहे, आठ ते दहा दिवसात बिले सादर होतील असे यावेळी सांगण्यात आले. याचप्रमाणे, बांधकाम दोन व तीन विभागाने देखील खर्चाचा आढावा सादर केला. प्रामुख्याने अंगणवाडी बांधकामे, आरोग्य केंद्र बांधकामे, मूलभूत व जनसुविधा अंतर्गत असलेली कामे याचाही सविस्तर आढावा बैठकीत झाला. जलसंधारण विभागातील सुरू असलेली कामे, अपूर्ण कामे, पूर्ण झालेली कामे तसेच निधी खर्च याचा आढावा देखील यावेळी झाला.

निधी खर्चात पिछाडीवर असलेल्या तालुक्यांचा गुंडे यांनी आढावा घेत, विचारणा देखील यावेळी केली. निधी खर्चासाठी केवळ २५ दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत कामे पूर्ण करून निधी खर्च करण्याची जबाबदारी सर्व अधिकाऱ्यांची आहे. निधी खर्च करायचा आहे त्यामुळे घाईघाईत कामे करू नका, कामे ही गुणवत्तापूर्व करा अशा सूचना गुंडे यांनी यावेळी दिल्या. निधी वेळात खर्च व्हावा, यासाठी नियोजन करा, निधी खर्चाचा पुन्हा आढावा घेतला जाईल असे गुंडे यांनी यावेळी सांगितले.