Kisan Long March : लाल वादळामधील मोर्चेकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने वासिंद येथे मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pundalik Jadhav

Kisan Long March : लाल वादळामधील मोर्चेकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने वासिंद येथे मृत्यु

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी येथुन विधानभावनावर जाण्यासाठी हजारो शेतकर्यांच्या बरोबर पायी लॉंगमार्च मध्ये सहभागी असलेल्या वन जमिन कसणाऱ्या मोर्चेकरी शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. मृत शेतकऱ्याच्या परीवाराना आर्थिक मदत देणेकामी प्रशासकीय पातळीवर अग्रक्रम देण्यात येईल, अशी माहीती दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी दिली. (marcher from Kisan Long March dies of heart attack in Vasind nashik news)

दिंडोरी तालूक्यातील मावडी येथील माकपचे पुंडलीक आंबु जाधव वय 58 ,हे दिनांक 11 मार्च रोजी किसान लाँग मोर्चाला दिंडोरी येथुन पायी निघाले होते. हजारो शेतकर्यां समवेत विविध मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी पदयात्रा करणारे जाधव यांचा शहापुर जवळील वासिंद येथे अकस्मात व अनपेक्षित मृत्यु झाला.

ही वार्ता मावडी गावात समजताच संपुर्ण गावावर शोककळा पसरली. मागेही याच मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता; त्याचवेळी मागण्या मान्य करुन जमीन नावावर करण्यात आली असती तर पुन्हा आता त्या मागण्या पुर्ण करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात वडीलांचे प्राण गेले नसते अशी भावनिक प्रतिक्रिया मुलगा गणेश जाधव यानी दिली.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

जाधव यांच्या पत्नीलाही हृदयविकाराचा त्रास असुन त्यांच्यासाठी हा धक्का असल्याच्या भावना भाऊ सुनिल जाधव यांनी व्यक्त केल्या. घटनेची माहीती मिळताच तहसीलदार पंकज पवार, सपोनी निलेश बोडखे व मंडलअधिकारी यांनी घटनास्थळावर जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले व शासकीय निधीतुन जाधव कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल अशी माहीती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली.

दरम्यान शोकाकुल वातावरणात जाधव यांचेवर अंत्यसःस्कार करण्यात आले. जाधव यांच्या मृत्युमुळे शोकमग्न मावडी वासीयांनी त्यांच्या परिवारास आर्थिक आधार देण्याची मागणी केली आहे. मयत जाधव यांचे पश्चात पत्नी , मुलगा , मुलगी असा परीवार आहे