esakal | शहीद जवान स्वनील रौंदळना अखेरचा निरोप; 'अमर रहे’ चा जयघोष
sakal

बोलून बातमी शोधा

soldier baglan

शहीद जवान स्वप्नील रौंदळना अखेरचा निरोप; 'अमर रहे’ चा जयघोष

sakal_logo
By
रोशन खैरनार

सटाणा (जि.नाशिक) : ‘स्वप्नील भाऊ अमर रहें’चा जयघोष... कुटुंबीयांचा आक्रोश, जवानांनी दिलेली अखेरची सलामी आणि शेकडो शोकसागरात बुडालेल्या नागरिकांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १४) रात्री उशिरा साश्रुनयनांनी भाक्षी (ता. बागलाण) येथील शहीद जवान स्वप्नील रौंदळ यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.

आगीत चार जवान होरपळून गंभीर; बुधवारी रात्री आले पार्थिव

गेल्या चार वर्षांपासून देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झालेल्या स्वप्नीलचे जम्मूच्या सीबीएस भालरा सेक्टर येथे अंतर्गत प्रशिक्षण सुरू होते. यादरम्यान मंगळवारी पहाटे बंकरमध्ये आग लागली. या आगीत चार जवान होरपळून गंभीर जखमी झाले. स्वप्नील ९० टक्के भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वप्नीलचे पार्थिव बुधवारी सकाळी दहाला जम्मूहून विशेष विमानाने मुंबईत आणले. मुंबईहून दुपारी तीनला रुग्णवाहिकेने सटाणा येथे आणण्यात आले. या वेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्वप्नील यांना पुष्पांजली वाहण्यात आली. या वेळी शहरातील चार फाट्यापासून ते दोधेश्वर नाक्यापर्यंत काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत ‘भारत माता की जय...’, ‘वीर जवान स्वप्नील अमर रहें...’चा जयघोष करत शेकडो तरुण सहभागी झाले होते. त्यानंतर ताहाराबाद रस्ता या प्रमुख मार्गाने त्यांच्या भाक्षी येथील राहत्या घरी पार्थिव आणण्यात आले.

जयघोष अन्‌ कुटुंबीयांचा आक्रोश

पार्थिव पाहताच वडील आमलक रौंदळ, आई प्रमिला, भाऊ तेजस, बहीण मयूरी यांनी एकच आक्रोश केला. यामुळे सर्वांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला होता. स्वप्नीलचे पार्थिव अर्धा तास अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. घरापासून फुलांनी सजविलेल्या वैकुंठरथावर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. अंत्यसंस्कारस्थळी पार्थिव येताच बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक निरीक्षक देवेंद्र शिंदे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, वीरपत्नी कल्पना रौंदळ, श्रीकांत रौंदळ, रेखा खैरनार आदींसह उपस्थितांनी स्वप्नील यांच्या पार्थिवावर हार आणि फुले वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी ‘अमर रहें अमर रहें, स्वप्नील भाऊ अमर रहें...’ ‘भारतमाता की जय...’ ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या जात होत्या. या वेळी जिल्हा सैनिक अधिकारी अविनाश रसाळ, ज्ञानेश्वर शिंदे, सुभेदार बाबूला बहरा, अमोल पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी सलामी दिली. स्वप्नील अविवाहित असल्याने त्यांचा सात वर्षांचा पुतण्या स्वामी याने अग्निडाग दिला. चौकट

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी शहीद स्वप्नील रौंदळ यांच्या संपूर्ण परिवाराची वैद्यकीय सेवा आपण मोफत करणार असल्याचे या वेळी जाहीर केले.